शिरोली पुलाची: शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा विजेच्या मोटरीचा धक्का लागून मृत्यू झाला. नवज्योत महादेव मोंगले (वय २२, रा. शिरोली माळवाडी) असे या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिरोली गावावर शोककळा पसरली आहे.
नवज्योत आज (दि.28) सकाळी नऊच्या सुमारास आपल्या शेतातून जनावरांसाठी वैरण घेऊन घरी आला होता. त्यानंतर दूध संस्थेत दूध घालून तो परतला. घराजवळील आपल्या ‘ज्योतिर्लिंग सर्व्हिसिंग सेंटर’मध्ये हातपाय धुण्यासाठी त्याने पाण्याची मोटार सुरू केली. त्याचवेळी अचानक मोटारीत बिघाड होऊन त्याला तीव्र विजेचा धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.
नवज्योत हा अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभावाचा होता. तो सर्वांशी आपुलकीने वागत असे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाल्याने त्याच्या अकाली निधनाने मोंगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शिरोली माळवाडी परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे.