कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील गोळिवणे येथील वृद्ध दाम्पत्याच्या खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मुख्य मारेकर्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत संशयिताने दाम्पत्याच्या खुनाची कबुलीही दिली आहे; मात्र खुनाचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात राहिले आहे. फरार असलेल्या अन्य दोघांना ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात आले.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या मारेकर्याच्या नावाबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्यांसह तपास अधिकार्यांनीही गोपनियता पाळली आहे. एक-दोन दिवसांत या प्रकरणाचा पर्दाफाश शक्य आहे, असे सांगण्यात येत आहे. शाहूवाडी तालुक्यातील परळे निनाई येथील निनो कंक (वय 75), त्यांची पत्नी रुक्मिणीबाई (70) यांचे मृतदेह आढळून आले होते.
बिबट्यासद़ृश वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; मात्र पोलिस चौकशीत दाम्पत्याची अमानुष हत्या झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. शाहूवाडी व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एका चाळीस वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने खुनाची कबुलीही दिली आहे. तपास पथकांची चक्रे गतिमान झाली असून एक-दोन दिवसांत या प्रकरणाचा उलगडा शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.