व्हनाळी : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक संजय घाटगे व गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिष घाटगे यांनी आज (दि. १५) दुपारी चार वाजता मुंबई भाजप कार्यालयात रितसर भाजपमध्ये पक्ष (Sanjay Ghatge joins BJP) प्रवेशाचा मुहूर्त साधला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. (Kolhapur Political News)
यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजप अध्यक्ष नाथाजी पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, राजवर्धन निंबाळकर, विजय जाधव, अरुणकुमार इंगवले, सुयशा घाटगे, दत्ताजीराव घाटगे आदी उपस्थित होते. आजच्या भाजप पक्ष प्रवेशासंदर्भात अरुण इंगवले व सुरेश हाळवणकर यांचे सहकार्य झाले. यावेळी कागल तालुक्यातील संजय घाटगे गटाचे स्थानिक गटनेते व तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौर्यात संजय घाटगे यांना तुम्ही पक्षप्रवेश करा, आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असे घाटगे यांना आश्वस्त केले होते. घाटगे पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशाने कागलमधील राजकारणात नवे ट्विस्ट निर्माण होणार आहेत. शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांची भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच संजय घाटगे व अंबरिष घाटगे यांचे भाजपमध्ये प्रवेश करण्यात पुढचे पाऊल ठरले आहे. कारण, कागलच्या राजकारणामध्ये घाटगे पिता -पुत्रांची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी जवळीक आहे.