कोल्हापूर : वळिवडे (ता. करवीर) येथील पोलंडवासीयांच्या ऐतिहासिक स्मृतीचे जतन करण्यासाठी उभारण्यात येत असलेले वस्तुसंग्रहालय लवकर पूर्ण व्हावे, तसेच भारत-पोलंड संबंध अधिक द़ृढ व्हावेत व व्यापाराला चालना मिळावी, यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी पोलंडचे कौन्सूल जनरल तोमाज विल्गोमास यांच्यासमवेत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली.
दुसर्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दाखवलेली मानवतावादी भूमिका आजही जगभरात स्मरणात आहे. युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या युरोपातून 5,000 पोलिश नागरिकांना भारतात आसरा देत वळिवडे येथे स्वतंत्र वसाहत उभारली. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
संभाजीराजे म्हणाले, 2019 साली या ऐतिहासिक घटनेला 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यावेळी येथे वास्तव्यास असलेल्या हयात पोलिश नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून आमंत्रित केले. त्यांना आणि या ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या ऐतिहासिक स्मृतींचे जतन व्हावे, तसेच दोन राष्ट्रांतील ऋणानुबंध अधिक द़ृढ व्हावेत, यासाठी वस्तुसंग्रहालय उभारण्यात येत आहे, ते लवकर पूर्ण करावे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत लवकरच विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.