चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आरक्षण निश्चित होताच उमेदवारांच्या नावाच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. त्याचवेळी जिल्हा परिषदेवर व तालुक्या-तालुक्यातील पंचायत समित्यांवरील वर्चस्वासाठी नेतेही सरसावले आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी तालुक्यावर वर्चस्व कोणाचे हे ठरविणारी ही निवडणूक नेत्यांसाठी अस्तीत्वाची लढाई आहे. एका बाजूला हे चित्र असले तरी सत्ताधारी आघाडीचे नेते महायुतीचीच सत्ता येणार, असे ठणकावून सांगत असतानाच पडद्यामागे स्वबळाची तयारी करत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत 2022 साली संपुष्टात आल्यानंतर प्रशासकीय कारकीर्द सुरू आहे. याकाळात निवडणुका होणार म्हणून अनेकांनी तयारी केली; मात्र निवडणुकाच न झाल्यामुळे इच्छुकांची तयारी वाया गेली. निवडणुका लांबल्याने इच्छुकांची संख्या व स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे एका एका जागेसाठीची चुरस पणाला लागली आहे. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीने पक्षही गेल्या निवडणुकीपेक्षा जादा संख्येने उपलब्ध झाले असले तरी एका एका जागेसाठी इच्छुकांच्या मोठ्या संख्येने व आपल्याच गटातील वाढत्या इच्छुकांमुळे नेते आताच बेजार झाले आहेत. आरक्षणानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होत असतानाच इच्छुक आता नाही तर कधीच नाही या त्वेषाने रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.
जिल्हा परिषदेवरील वर्चस्वासाठी नेत्यांमध्ये ईर्ष्या आहे. महायुतीचा अध्यक्ष होणार, महायुतीची सत्ता येणार, अशा घोषणा नेते देत असले तरी प्रत्यक्षात स्वबळाची तयारी सुरू आहे. एका एका जागेसाठी प्रत्येक पक्षातून इच्छुकांची असलेली संख्या पहाता ही निवडणूक महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढवून निवडणुकीनंतर महायुती म्हणून एकत्र येण्याची शक्यता आहे. यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षीत आहे. त्यामुळे वर्चस्वासाठी चढाओढ सुरू आहे. महायुतीत स्वबळाची तयारी सुरू असतानाच महाविकास आघाडीत लवकरच बैठकांचे सत्र सुरू होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते लवकरच बैठकीच्या माध्यमातून भेटणार असून त्यानंतरच त्यांच्याकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.