कोल्हापूर : दसरा-दीपावलीच्या प्रसन्न आणि उत्साही वातावरणात ‘पुढारी नाट्योत्सव’ कोल्हापूरकरांसाठी एक अविस्मरणीय सांस्कृतिक मेजवानी ठरला. मंगळवारी (दि. 7) संकर्षण कर्हाडे लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘नियम व अटी लागू’ आणि बुधवार, दि. 8 रोजी लीना भागवत व मंगेश कदम यांचे गाजलेले नाटक ‘आमने-सामने’ या दोन नाटकांनी रसिकांना भावनांच्या आणि विनोदाच्या हिंदोळ्यांवर अनोखी सफर घडवली. सायबर कॉलेजच्या आनंदभवन नाट्यगृहाने पहिल्यांदाच एवढ्या तुफान गर्दीत सादर झालेल्या नाट्यप्रयोगांचा अनुभव घेतला.
‘पुढारी नाट्योत्सवा’चे मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ अॅन्ड ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक होते, तर ड्रीम व्हीजन हॉस्पिटॅलिटी हे सहप्रायोजक होते. दोन्ही नाटकांना कोल्हापूरकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कलाकारांमध्ये अधिक ऊर्जा संचारली. ‘नियम व अटी लागू’ या नाटकात अमृता देशमुख हिने साकारलेली आदिती, संकर्षन कर्हाडे यांनी साकारलेला गौरव यांच्या विवाहातील लहान-मोठे वाद, ऑफिस तसेच घरातील ताण-तणाव अत्यंत हलक्याफुलक्या आणि खुमासदार शैलीत रंगमंचावर सादर करण्यात आले. मंगेश भिडे यांनी साकारलेल्या स. दा. अतिरेककर या तिसर्या पात्राने दोघांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत गुंतवून प्रेक्षकांना हसवत-हसवतच वैवाहिक जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवले.
बुधवारी सादर झालेल्या ‘आमने- सामने’ या नाटकाने घरातील तंटे आणि रोजच्या जीवनातील विनोदी प्रसंगांचे तरल सादरीकरण केले. लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी सादर केलेल्या धमाल विनोदी आणि चुरचुरीत प्रसंगांनी अनेकदा रसिकांचा वन्समोअर मिळवला. साहिल आणि समिराच्या भूमिकेत रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी अप्रतिम अभिनय केला. सर्वच कलाकारांचा सहज संवाद आणि प्रभावी देहबोली यामुळे दोन्ही नाट्यप्रयोग कोल्हापूरकरांसाठी संस्मरणीय ठरले. या अभूतपूर्व प्रतिसादाने भारावून गेलेल्या अभिनेत्री लीना भागवत यांनी लवकरच नाटकाचा पुन्हा कोल्हापूर दौरा आयोजित करण्याचे आश्वासन दिला.