कोल्हापूर : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. हल्ला करणार्या वकिलावर न्यायमूर्तींनी सुमोटोची कारवाई करावी, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. कोल्हापूरसह जिल्ह्यातील साडेतीन हजारांवर वकील मंगळवारी न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त होते. बुधवारपासून तीन दिवस वकील लालफिती लावून कामकाज करणार आहेत. दरम्यान, हल्ल्याचा प्रयत्न करणार्या वकिलाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी हल्ल्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने न्याय संकुल येथील शाहू सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाहीवर हल्ला होत असताना वकील, समाजधुरीण शांत राहिले, तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात आली.
यावेळी झालेल्या चर्चेत बारचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महादेवराव आडगुळे, प्रकाश मोरे, प्रशांत चिटणीस, धनंजय पठाडे, अजित मोहिते, समीउल्ला पाटील, किरण पाटील, शिवाजीराव राणे, पी. आर. पाटील, बाळासाहेब पाटील, रणजित गावडे, सर्जेराव खोत, कल्पना माने, राजेंद्र मंडलिक सहभागी झाले होते. बैठकीनंतर वकिलांनी न्याय संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी निषेध सभेत तीन ठराव मांडले. पहिल्या ठरावात सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दुसर्या ठरावात सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी राकेश किशोर याच्यावर सुमोटो कारवाई करावी, तिसर्या ठरावात सनातन विचारांचा निषेध करण्यात आला. यावेळी सनातनीय विचारामुळे लोकशाही, संविधान धोक्यात येत असल्याने ते वाचविण्यासाठी अॅक्शन कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अॅक्शन कमिटीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. अॅड. प्रकाश मोरे यांच्यासह अन्य वकिलांचा समितीत समावेश करण्यात आल्याचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांनी जाहीर केले.