कोल्हापूर : पेठवडगावमध्ये राज पाटील आणि प्रवीण माने या दोन ‘पाळीव’ गुंडांच्या गँगमुळे गावात अक्षरश: उत्पात माजला आहे. त्यांचे अवैध धंदे, खंडणीखोरी आणि रोजच्या हाणामार्यांमुळे गावातील सर्वसामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. त्यामुळे या दोन गुन्हेगारी टोळ्यांचा समूळ बिमोड करण्याची गरज आहे.
पूर्वी पेठवडगावचा चेहरामोहरा हा एक शांत आणि सुसंस्कृत शहर असा होता. पण, साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वी शहरात राज पाटील आणि प्रवीण माने या दोन गुन्हेगारी म्होरक्यांचा उदय झाला आणि वडगावची शांतता हरवत गेली. सुरुवातीला या दोन्ही गँग्ज एकत्रच होत्या. वडगावच्या तालमीत पैलवानकीचे धडे गिरवीत होत्या. पण, नारळावरच्या कुस्त्या मारण्यापूर्वीच पैलवानकी त्यांच्या डोक्यात गेली आणि तालमीत कुस्तीचे धडे गिरवण्याऐवजी या मंडळींनी गुन्हेगारीचे एकएक डावपेच टाकायला सुरुवात केली.
सुरुवातीला ही मंडळी शहरात छोट्या-मोठ्या चोर्या-मार्या करायला लागली. साहजिकच त्यात राज पाटील हा आघाडीवर होता. चोर्या-मार्या करून फारसे काही मिळत नाही, हे लक्षात आल्यावर या मंडळींनी तालमीत कमावलेल्या बाहुबलाच्या जोरावर आपला मोर्चा शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांकडे वळवला. मुळातच वडगावातील व्यापारी-व्यावसायिक हे शांत प्रवृत्तीचे, त्यामुळे या मुजोर मंडळींपुढे त्यांचे चालेनासे झाले आणि त्यांनी या गावगुंडांच्या दबावाला बळी पडून त्यांना छोट्या-छोट्या खंडण्या देण्यास सुरुवात केली. व्यापारी आपल्या कह्यात आल्याचे बघताच या गावगुंडांनी खंडणीची रक्कम हजाराच्या आणि लाखाच्या घरात नेऊन ठेवली.
सुरुवातीला राज पाटील हाच या गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या होता; मात्र हळूहळू जातीय श्रेष्ठत्वाच्या आणि गँगच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून या गँगमध्ये फूट पडली. एक गट राज पाटील याच्या नेतृत्वाखाली एकवटला तर दुसरा गट प्रवीण माने आणि अक्षय माने यांच्या नेतृत्वाखाली काम करू लागला. गँगमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा गावावरील वर्चस्वाच्या मुद्द्यावरून या गँगमध्ये परस्परविरोधी सूडभावना वाढीला लागली आणि सुरू झाल्या रोजच्या हाणामार्या!
वडगाव शहरात दिसामासागणिक फोफावत निघालेल्या या दोन गुन्हेगारी टोळ्यांचे अत्यंत धोकादायक सामाजिक दुष्परिणाम आता समोर येऊ लागलेले दिसत आहेत. आजकाल गावातील शालेय मुले आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये या गावगुंडाच्या टोळ्यांची ‘क्रेझ’ वाढू लागली आहे. गावातील शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये या तडीपार गुंडांच्या नावाने दोन-दोन गट पडलेले दिसत आहेत. त्यातून महाविद्यालयांमधील शैक्षणिक वातावरणही दिवसागणिक गढूळ होताना दिसत आहे. महाविद्यालयीन तरुण या फटीचर गुंडांचा आदर्श घेत असतील तर सामाजिक शांतता आणि सलोख्याच्या द़ृष्टीने ते धोकादायक आहे. आज या दोन्हीही गुन्हेगारी टोळ्यांकडे बारा-पंधराशे तरुणांची गँग तयार असलेली दिसते, अर्थातच यातही पुन्हा राज पाटील याच्याकडे थोडी जादाच! त्यामुळे वडगाव शहराचा चेहरामोहरा विद्रूप करायचा नसेल आणि इथे पूर्वीसारखी शांतता नांदवायची असेल तर या दोन्ही गँगना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून त्यांचे कंबरडे मोडण्याची आवश्यकता आहे.
राज पाटील आणि माने गँगमधील काही गुन्हेगारांना अलीकडे कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे; पण हद्दपारीसारख्या किरकोळ उपायांनी सुधारण्याच्या पलीकडे गेलेल्या या पिलावळी आहेत. हद्दपार झाले तरी राज पाटीलसह अन्य काही गुन्हेगारांचा आजही वडगाव शहरात खुलेआम वावर सुरूच आहे. त्यामुळे या पिलावळीला जर जबर चाप लावायचा असेल तर त्यांना मोका लावून बंदिस्त करण्याची गरज आहे.
हळूहळू पाटील आणि माने गँगने पैसा कमावण्याचा साधा सोपा मार्ग म्हणून साहजिकच आपला मोर्चा मटक्याकडे वळविला आणि शहराच्या काना-कोपर्यात, चौकाचौकात आणि गल्लीबोळात मटक्याच्या टपर्यांचे पीक फोफावत गेले. त्यातून पुन्हा कुठली ‘चिठ्ठी’ कोण घेणार यावरूनही दोन गँगमध्ये संघर्ष सुरू झाला. त्यानंतर या दोन्ही गुन्हेगारी टोळ्यांनी तीन पानी जुगार, अंदर-बाहर, रमी असे जुगाराचे एकामागोमाग एक इमले रचायला सुरुवात केली आणि आजही ते सुरूच आहे. अर्थातच यातही पुन्हा गॅम्बलर राज पाटील हाच आघाडीवर असलेला दिसतो. साहजिकच हे सगळे वडगाव पोलिसांच्या ‘अर्थपूर्ण’ सहकार्याशिवाय शक्यच नव्हते. त्यामुळे वडगावमध्ये या गुन्हेगारी टोळ्यांचे पीक फोफावण्यास पोलिसही तितकेच जबाबदार आहेत.