दिलीप भिसे
कोल्हापूर : गुंतवणुकीवर दरमहा दहापासून चाळीस टक्क्यांवर परताव्यांचे आमिष दाखवून शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सीसह ट्रेडिंगसंदर्भातील शेकडो कंपन्यांनी पाच वर्षांत आलिशान कार्यालये थाटली. एजंटाच्या साखळीतून कंपन्यांनी कोट्यवधींच्या उलाढालीचा टप्पाही गाठला; मात्र संचालकांच्या खाबुगिरीमुळे पन्नासावर बड्या कंपन्यांना टाळे लागले. त्यामुळे पंधरा हजारांवर गुंतवणूकदारांना सुमारे 9 हजार 500 कोटींचा फटका बसला असतानाही फसवणुकीचे फंडे सुरू राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहर, ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर एजंटांचे रॅकेट निर्माण करून अल्पकाळात गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालून पसार व्हावे, अशीच काहीशी परिस्थिती आहे. शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांनी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक, गोव्यासह 7 राज्यांतील दहा हजारांवर गुंतवणूकदारांना गंडा घातला.
ना कोणी शासन दरबारी आवाज उठविला ना दोषींविरुद्ध कायदेशीर लढा उभारला. सारेच ढिम्म... परिणाम ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांतील गैरव्यवहाराचा भांडाफोड झाल्यानंतरही दहा-पंधरा कंपन्यांनी शहरात बेधडक आलिशान कार्यालये थाटून कोट्यवधीचा गंडा घातला.
सामान्य गुंतवणूकदारांसह उद्योजक, व्यावसायिकांना कोट्यवधीचा गंडा घालणार्या बोगस कंपन्यांचे पेव फुटलेले असतानाही पंधरवड्यात जादा परताव्यांच्या बहाण्याने डॉक्टर दाम्पत्यासह 7 जणांची अनुक्रमे 1 कोटी 10 लाख व 98 लाख 96 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. जुना राजवाडा, शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. बोगस कंपन्यांसह खाबुगिरीला सोकावलेल्या यंत्रणेविरुद्ध जनजागृती होत असतानाही कोट्यवधीचा गंडा घालण्याच्या घटना घडत आहेत. यावर आश्चर्य व्यक्त होत आहे.
फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. डेव्हलपर्ससह ट्रेडविंग सोल्यूशन, टेक्सम व्हेचर, ए. एस. ट्रेडर्स सोल्यूशन, ग्रोबझ मल्टिट्रेड, ग्रोबझ इंडिया अर्बन निधी, एस.एम. ग्रोबल प्रा. लि. ई-स्टोअर, ट्रेक्सम व्हेंचरसह 50 पेक्षा जादा कंपन्यांतील संचालक, एजंटांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. काही संशयितांना अटक झाली आहे. बहुतांश गुन्ह्यांतील संशयित अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्या बहुतांश कंपन्यांतील उलाढालीचे फॉरेन्सिक ऑडिटही झाल्याचे दिसून येत नाही.
घोटाळ्यात बुडालेल्या आणि टाळे ठोकलेल्या बहुतांश कंपन्यांतील एजंटांसह त्यांचे कुटुंबीय अल्पकाळात कोट्यधीश झाल्याची प्रकरणे तपास पथकांच्या चौकशीतून उघड झाली आहेत. कर्नाटकातील एका एजंटासह त्याच्या कुटुंबाला पाच-दहा नव्हे, तर तब्बल 36 कोटींचे कमिशन मिळाले आहे. न्यायालयाने या घटनेची दखल घेत सखोल चौकशीचे आदेशही दिले आहेत; मात्र संबंधित कोट्यधीश एजंटावर कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसून येत नाही.