कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) 600 खाटांचे महत्त्वाचे रुग्णालय आहे. येथे अपघात विभाग सतत रुग्ण व नातेवाईकांनी गजबजलेला असतो. या विभागात अत्यंत जबाबदारीने काम करणार्या वैद्यकीय अधिकार्यांची आवश्यकता असते. मात्र, या विभागात केवळ तीनच डॉक्टरांवर रात्रंदिवस काम करण्याची वेळ आली आहे.
काही वैद्यकीय अधिकारी अपघात विभागाची ड्युटी टाळत असून, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात वेगवेगळ्या कामांच्या नावाखाली ठिय्या मारून बसले आहेत. त्यामुळे निवडक काही डॉक्टरांनाच शिफ्टनुसार अपघात विभागात ड्युटी करावी लागत आहे.
सीपीआरमध्ये दररोज सुमारे 2,000 रुग्ण ओपीडीसाठी येतात. अपघात, मारामारी, सर्पदंश, विष प्राशन यासारख्या गंभीर घटनांतील रुग्ण असतात. हा विभाग 24 तास सुरू असतो. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय यांना नेहमीच सजग राहावे लागते. मात्र, अपघात विभागाचे काम मानसिक तणाव निर्माण करणारे असल्याने अनेक डॉक्टर हे काम टाळत आहेत. त्यामुळे कामाचा ताण काही डॉक्टरांवरच येतो.
अलीकडेच अपघात विभागात काम करणार्या चार कंत्राटी डॉक्टरांना कमी करण्यात आले आहे. परिणामी, आता फक्त तीन डॉक्टरांच्या खांद्यावरच संपूर्ण विभागाची जबाबदारी आहे. यामुळे त्यांना सलग ड्युटी करावी लागत आहे. एमपीएससी परीक्षेतून भरती झालेले डॉक्टर कंत्राटी डॉक्टरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असूनही अपघात विभागात ड्युटी टाळत आहेत आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातच बसून राहतात. विशेष म्हणजे, अपघात विभागाचे प्रमुखही स्वतः ड्युटी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यामुळे उरलेल्या मोजक्या डॉक्टरांवर ताण येत आहे.
600 खाटांचे सीपीआर रुग्णालय अपघातग्रस्तांसाठी महत्त्वाचे केंद्र
अपघात विभागात केवळ तीन डॉक्टरांवर 24 तास रुग्णसेवेचा भार
काही डॉक्टरांची अपघात विभागाला बगल; अधीक्षक कार्यालयात ‘आराम’
कंत्राटी डॉक्टरांना कमी केल्याने अडचणी वाढल्या; कायम डॉक्टरांकडून टाळाटाळ
दोन हजार रुग्णांची ओपीडी; अपघात विभागात गंभीर रुग्णांची सतत वर्दळ
अपघात विभागप्रमुखही ड्युटी टाळत असल्याने डॉक्टरांवर अतिरिक्त ताण