सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. दाटीवाटीने असलेले रस्ते आणि त्यातच ढीगभर वाहने अशी अवस्था झाली आहे. सिग्नलला तर कुणाला थांबायला वेळ नसल्यासारखी स्थिती आहे. परिणामी, सिग्नल जंपबरोबरच शहरात अनेक ठिकाणी खुलेआम ट्रॅफिकच्या नियमांना धुडकावून लावले जात आहे.
गेल्या दीड वर्षात तब्बल एक लाखांवर वाहनचालकांनी ट्रॅफिकचे नियम अक्षरशः चिरडले आहेत. वाहतूक उल्लंघन प्रकरणात पोलिसांनी सात कोटी दंडाची रक्कम वसूल केली आहे. ही आकडेवारी पाहता शहरातील वाहनचालक नियमांकडे किती दुर्लक्ष करत आहेत, हे स्पष्ट होते. ‘शिस्त हरवली, सिग्नल झुकले... एक लाख वाहनांनी नियम तोडले’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शहरात वाहने मोठ्या प्रमाणावर वाढली असताना ट्रॅफिक शिस्त मात्र दिवसेंदिवस ढासळताना दिसत आहे. वाहन चालवताना वन-वेतून प्रवास, ट्रिपल सीट, कर्णकर्कश हॉर्न, सिटबेल्ट, सिग्नल तोडणे, स्पीड लिमिटचा भंग, पार्किंग नियमांचे उल्लंघन, मोबाईल वापरत गाडी चालवणे अशा सर्व ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे जणू नवीन शहरी फॅशन झाल्याचे चित्र कोल्हापूर शहरात एकूण 39 सिग्नल आहेत. अनेक वाहनचालक सिग्नल न पाळताच पुढे जातात. शहरातील वाहतूक नियंत्रण विभागाने एक लाखाहून अधिक नियमभंग करणार्यांकडून 7 कोटींहून अधिक दंड वसूल केला.
ही रक्कम म्हणजे शहरातील वाहतूक बेशिस्तीचा आरसा आहे. अपघात कमी करायचे असेल, तर लोकांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि सामाजिक भान निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन, पोलिस यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आणि नागरिक अशा सर्वांनी मिळून पुढाकार घेणे हेच काळाचे खरे उत्तर ठरेल.