नंदगाव : नंदगाव (ता. करवीर) येथे गायरानामध्ये एका कुटुंबात बुधवारी सकाळी बारशाचा कार्यक्रमानंतर संध्याकाळी साऊंड सिस्टीम लावून तोकडे कपडे घालून दोन तरुणींसोबत या कुटुंबातील काही तरुण मद्यधुंद अवस्थेत अश्लील हावभाव करीत नृत्य करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थ व तरुणांत संतापाची लाट उसळली. बघता बघता शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव जमला. अश्लील हावभाव करत नृत्य करणारे कुटुंब परजिल्ह्यातून काही वर्षांपूर्वी नंदगावात आले आहे. गायरानात राहात असलेल्या या कुटुंबाचा उदरनिर्वाह खेकडे व मासे विकून चालतो. हे तरुण आमच्या गावातील अल्पवयीन मुलांना वाईट व्यसनांचा नाद लावत आहेत. त्यात भर म्हणून हे असले कार्यक्रम आयोजित करत आहेत, त्यांना धडा शिकवूया, असे म्हणत गायरानाच्या दिशेने जमाव चालून निघाला. याची माहिती इस्पुर्ली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेख यांना समजली. त्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व जमावाला शांत करून एकूण आठजणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. काहीजण अंधाराचा फायदा घेऊन पळाले.
पोलिस कॉन्स्टेबल अनिल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रणजित शंकर पोवार (30), मिथुन शंकर पोवार (40), अनिल शंकर पोवार (24, रा. नंदगाव ) राजकुमार सोन्या चव्हाण (35, रा. टोप संभापूर), सचिन नरसू पवार (24, रा वारणा कोडोली), राहुल साहेबराव जाधव (22, रा. कवठे शिरूर, ता. वाई) यांच्यासह दोन नृत्यांगनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मधुकर शिंदे करीत आहेत.