आशिष शिंदे
कोल्हापूर : स्तन कर्करोगाचे निदान लवकर आणि अचूकपणे करणे आता शक्य होणार आहे. कोल्हापुरातील संशोधकांनी अत्याधुनिक इलेक्ट्रोकेमिकल इम्युनोसेन्सर तयार केला आहे. याच्या साहाय्याने स्तन कर्करोगाशी संबंधित सीए 15-3 या बायोमार्करचे अतिशय कमी प्रमाण अचूक व काही मिनिटांत मोजता येणे शक्य आहे. हे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालायतील संशोधकांनी दक्षिण कोरियातील चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठाच्या सहकार्याने केले आहे.
सध्या स्तन कर्करोगाचे निदान प्रामुख्याने रक्त तपासणी, मॅमोग्राफी किंवा बायोप्सी उपचार पद्धतीने केले जाते. या प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असतात. ग्रामीण भागात अशा सुविधा उपलब्ध नसतात. या परिस्थितीत इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर तत्काळ प्राथमिक तपासणीसाठी उपयुक्त ठरू शकतो, ज्यामुळे लवकर निदान आणि उपचार सुरू करणे शक्य होईल.
बायोमार्कर म्हणजे शरीरात नैसर्गिकरीत्या तयार होणारे किंवा आजारामुळे निर्माण होणारे असे विशिष्ट प्रथिने, अणू, जनुक किंवा रसायन. याद्वारे एखाद्या आजाराची तीव—ता ओळखता येते. सीए 15-3 हा स्तन कर्करोगासाठी महत्त्वाचा बायोमार्कर आहे. हा सेन्सर म्हणजे एक छोटे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे रक्तातील सीए 15-3 या बायोमार्करचे अस्तित्व ओळखतो. पारंपरिक पद्धतीने अशी तपासणी करण्यासाठी वेळ लागतो आणि अशा तपासण्या खर्चिक असतात; मात्र या नॅनोसेन्सरमुळे निदान काही मिनिटांत होऊ शकते.
या सेन्सरमध्ये मल्टीवॉल्ड कार्बन नॅनोट्यूब्स वर प्लॅटिनम आणि आयर्न ऑक्साईड नॅनोपार्टिकल्स बसवलेले आहेत. जेव्हा रक्तात सीए 15-3 बायोमार्कर असतो, तेव्हा हा बायोमार्कर सेन्सरवरील विशेष अँटिबॉडीजशी जोडतो. या प्रतिक्रियेमुळे विद्युत संकेत निर्माण होतो. त्यामुळे सेन्सर काही सेकंदांतच रुग्णाच्या रक्तात बायोमार्कर आहे की नाही तसेच किती प्रमाणात आहे हे दाखवतो.