डॅनियल काळे
कोल्हापूर : अडीच महिन्यांपूर्वीच न झालेल्या ड्रेनेज लाईनच्या कामाचे तब्बल 85 लाखांचे बिल उचलल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात टंकलिखित मोजमाप पत्राचा वापर करून बिल मंजूर करण्यात आले होते. या घोटाळ्याने एकच खळबळ माजली असतानाही महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतलेला नाही. उलट गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पवडी विभागात टंकलिखित मोजमाप पुस्तकांवर आधारित बिले मंजूर करण्याचा धडाका सुरूच आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेला हा प्रकार म्हणजे नव्या घोटाळ्यांना आमंत्रण दिल्याचाच प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व शासकीय व स्थानिक संस्था फक्त हस्तलिखित मोजमाप पुस्तकाचाच वापर करतात. हीच पद्धत कोल्हापूर महापालिकेतदेखील अनेक वर्षे रूढ होती. परंतु, आता ती पद्धत मोडीत काढून ‘सोयीची टंकलिखित मोजमाप पुस्तके’ तयार करून बिले मंजूर केली जात आहेत. या प्रकारामुळे आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्यांचा धोका वाढला आहे. वरिष्ठ अधिकार्यांचेही या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.
कोल्हापूर महापालिकेतील घोटाळ्यांची मालिका नवी नाही. जुलै महिन्यात कसबा बावडा येथील ड्रेनेजलाईन कामाचे 85 लाखांचे बोगस बिल काढल्याचा प्रकार शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी उघडकीस आणला होता. त्या वेळी अधिकार्यांनी या बिलावर बोगस सह्या झाल्याचा दावा केला होता; परंतु डिजिटल सहीविषयी मात्र सर्वांनी मौन पाळले. विशेष म्हणजे त्या बिलासाठी दुसर्याच कामाची मोजमाप पुस्तिका वापरण्यात आली होती आणि त्यात खाडाखोडही करण्यात आली होती. हा प्रकार म्हणजे महापालिका प्रशासनातील दुर्लक्षाचा परिणाम आहे.
मोजमाप पुस्तक हा ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठीचा मुख्य आणि कायदेशीर दस्ताऐवज आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली (Public Works Manual) आणि लेखा संहितेनुसार मोजमाप प्रत्यक्ष अधिकार्याने हस्तलिखित स्वरूपातच करणे बंधनकारक आहे. अशा नोंदीवरच ऑडिटमध्ये विश्वास ठेवला जातो. मात्र कोल्हापूर महापालिकेत हे सर्व नियम धाब्यावर बसवून, टंकलिखित मोजमाप पुस्तकांवरूनच बिले मंजूर करण्याचा पायंडा पडत आहे.
राज्य शासनाच्या नियमानुसा ‘ई-एमबी’ (e- Measurement Book) प्रणाली वापरणे कायदेशीरद़ृष्ट्या ग्राह्य आहे; मात्र त्यावर अधिकार्याची डिजिटल स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. कोल्हापूर महापालिकेत मात्र हे टाळून ‘सोयीचा मार्ग’ म्हणून टंकलिखित मोजमाप पुस्तकांचा वापर केला जात आहे. या पद्धतीमुळे नव्या आर्थिक घोटाळ्यांना आमंत्रण मिळत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.