कोल्हापूर : महापालिकेच्या 2015-2020 च्या सभागृहात भाजप आघाडीचे 33 नगरसेवक होते. महायुतीतर्फे महापालिका निवडणूक लढविली तरी किमान 33 जागा मिळाव्यात. तसेच अन्यत्र तुल्यबळ उमेदवार द्यावेत, अशी मागणी भाजप पदाधिकार्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष घातले. मंत्री पाटील यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी व माजी नगरसेवकांशी चर्चा केली. यावेळी राहुल चिकोडे, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव यांच्यासह इतर उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मंत्री पाटील कोल्हापूर दौर्यावर आले असता त्यांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माजी नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. भाजप पदाधिकार्यांनी किमान 33 जागा लढण्याचा आग्रह धरला. तसेच अन्य ठिकाणी सक्षम उमेदवार नसतील तेथे महायुतीकडून आणखी जागा मागून घेऊन कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरचा महापौर महायुतीचाच करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मंत्री पाटील यांनी सर्वांशी संवाद साधून मतदार संघाचा आढावा घेतला. तसेच कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन महायुतीचा महापौर होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविणार असल्याचे स्पष्ट केले.