कोल्हापूर : तावडे हॉटेल चौक येथे सकल धनगर समाज बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पडळकर.  Pudhari File Photo
कोल्हापूर

येत्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाची ताकद दाखवू : आ. पडळकर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : धनगर समाजासाठी राज्य घटनेने दिलेल्या अनुसूचित जमाती आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करा; अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाज राजकारण्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी कोल्हापूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाच्यावेळी दिला. चुकीच्या पध्दतीने दिलेली धनगड प्रमाणपत्रे तत्काळ रद्द करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

यावेळी आ. पडळकर म्हणाले, राज्यात धनगर समाजाची मोठी ताकद आहे. विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात 25 हजारपासून एक लाख साठ हजारपेक्षा जास्त मतदार संख्या आहे. आपल्या समाजाने एकजूट दाखवली तर हे राज्यकर्ते गुडघे टेकतील. केवळ राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच गेल्या 75 वर्षांहून अधिक काळ धनगर समाजावर अन्याय झाला आहे. अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यामुळेच धनगर समाज सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या मागास राहिला आहे. मुख्य व्यवसाय मेंढपाळ असलेला हा समाज आपल्या कुटुंबासह वर्षातून आठ ते दहा महिने भटकंती करत असतो. अनुसूचित जमातीच्या आरक्षणामुळे या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले असते. या समाजातील मुले शिक्षण घेऊन आयपीएस अधिकारी झाली असती. तसेच लोकांना चांगल्या प्रतीचा मांसाहार मिळावा यासाठीच धनगर समाज दररोज तीस ते पस्तीस किलोमीटरचे अंतर चालत मेंढपाळ व्यवसाय करत असतो.

बबनराव रानगे म्हणाले, राज्य शासनाने अनेक घोषणा केल्या. परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. शासन वेळकाढूपणा करत धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नागेश पुजारी, डॉ. संदीप हजारे, ललिता पुजारी, योगिता घुले, राजू पुजारी, अमोल गावडे यांचीही भाषणे झाली. आंदोलनस्थळी युवक आक्रमक होते. त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी रामचंद्र डांगे, बयाजी शेळके, कल्लाप्पा गावडे, संजय पटकारे, अशोक कोळेकर, राघू हजारे, मच्छिंद्र बनसोडे, राजेंद्र कोळेकर, राजेश तांबवे, मायाप्पा पुजारी, अभिजित बते, विकास घागरे, संजय काळे, संपत रूपने, कृष्णा पुजारी यांच्यासह जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी व मेंढपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मतदानाला चालतो, मात्र तिकीट नाही

राज्यात दोन नंबरची लोकसंख्या असलेला धनगर समाज केवळ निवडणुकीत मतदानापुरता चालतो. मात्र उमेदवारी दिली जात नाही. समाजातील कोणी नेता साखर कारखाना, बँकेचा चेअरमन नाही. त्यामुळेच समाजाची राजकीय ताकद कमी पडत असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितले.

आंदोलनाची पुढील दिशा लवकरच

गेल्या पंधरा दिवसांपासून या समाजातील काही युवक पंढरपूर, लातूर व नेवासा येथे आमरण उपोषण करत आहेत. शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर आंदोलन तीव— करणार आहे. यासाठी आंदोलनाची पुढील दिशा लवकरच ठरवणार आहे, असा इशाराही आ. पडळकर यांनी दिला.

शेळ्या-मेंढ्यांसह धनगर समाज आंदोलनात सहभागी

तावडे हॉटेल चौकात जिल्ह्यातील सकल धनगर समाजाने रास्ता रोको केला. शेळ्या-मेंढ्यांसह विविध गावचे धनगर समाज मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. डोक्यावर पिवळी टोपी... गळ्यात पिवळा स्कार्फ आणि कपाळाला भंडारा लावून आंदोलक रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार...’ ‘अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करा...’ अशा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. सुमारे दोन तासहून अधिक वेळ रास्ता रोको केल्याने येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT