Leopard death | पन्हाळ्यावर सापडला बिबट्याचा मृतदेह 
कोल्हापूर

Leopard death | पन्हाळ्यावर सापडला बिबट्याचा मृतदेह

दुसर्‍या बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पन्हाळा : पन्हाळा वन परिक्षेत्रातील सोमवार पेठ परिसरात 15 महिन्यांच्या मादी बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासणीनंतर मादी बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिकदृष्ट्या हा मृत्यू दुसर्‍या बिबट्याच्या हल्ल्यातून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हल्ल्यामुळे झालेल्या खोल जखमांमधून अतिरक्तस्राव झाल्यामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असे पशुवैद्यकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, परिक्षेत्र वनाधिकारी पन्हाळा अजित माळी, सागर पटकारे, संदीप पाटील व वन्यजीव बचाव पथक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक माहिती घेतली जात आहे. पुढील तपास सुरू असून परिसरातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

भक्ष्यासाठी जुंपली?

जंगलात बिबटे, वाघ मादी किंवा भक्ष्यासाठी एकमेकांवर हल्ले करतात. यात वर्चस्व मिळवणारा बिबट्या किंवा वाघ मादी किंवा भक्ष्यावर हक्क दाखवतात. सोमवार पेठेत घडलेल्या प्रकारात मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिकार केलेले भक्ष्य खाण्यावरून दोन बिबट्यांमध्ये जुंपली असण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT