यड्राव : शहापूर पोलिसांनी 'मिशन झिरो ड्रग्ज' अभियानांतर्गत मोठी कारवाई करत हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे तब्बल ६ लाख ७३ हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोची येथील साईनाथ वजन काट्यानजीक १८ जुलै रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुंभार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. ऋषभ राजू खरात (वय ३०, रा. लोकमान्य नगर, कोरोची) हा तरुण संशयास्पदरीत्या आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत १३४.०४ ग्रॅम मेफेड्रॉन, रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ७३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी 'मिशन झिरो ड्रग्ज' मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन अंमली पदार्थांच्या विक्री किंवा सेवनाबाबतची गोपनीय माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.