Cobra rescue 
कोल्हापूर

Kolhapur news: फणा काढून उभ्या कोब्राला शांत करत सुरक्षित पकडलं; साळवणच्या तरुणाचं कौतुक

Cobra rescue latest news: आक्रमक कोब्राला शांत करत पकडल्याने साळवणचा सर्पमित्राची भागात चर्चेच्या केंद्रस्थानी

पुढारी वृत्तसेवा

राजेश सातपुते

साळवण: गगनबावडा तालुक्यातील खोकूर्ले गावात बुधवारी (दि.०९) एक थरारक आणि जीवघेणा प्रसंग घडला. वसंत भिवा लाड यांच्या घरात अचानक विषारी सापांपैकी एक असलेला किंग कोब्रा (King Cobra) शिरल्याने गावभर भीतीचे सावट पसरले. घरातील गणेश लाड यांनी तातडीने ही माहिती साळवणचे ख्यातनाम सर्पमित्र रघुनाथ (आर.के.) पाटील उर्फ धामोडकर यांना दिली आणि त्यानंतर सुरू झाला धाडसाने वन्यजीवाला जीवदान देण्याचा थरारक प्रसंग.

माहिती मिळताच सर्पमित्र रघुनाथ पाटील यांनी क्षणभरही न थांबता घटनास्थळी धाव घेतली. घराच्या एका कोपऱ्यात फणा काढून आक्रमक अवस्थेत बसलेला हा अजस्त्र किंग कोब्रा पाहून उपस्थित ग्रामस्थांच्या अंगावर काटा उभा राहिला. परिस्थिती अत्यंत धोकादायक असतानाही, पाटील यांनी स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करत, शांततेने आणि अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली.

अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्यांनी अत्यंत संयम व कौशल्य वापरत या महाकाय कोब्राला सुरक्षितपणे पकडले आणि विशेष डब्यात बंद केले. कोब्राला पकडताच गावकऱ्यांनी आनंदाने जल्लोष केला आणि सापाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. पकडल्यानंतर सर्पमित्र पाटील यांनी या विषारी किंग कोब्राला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घनदाट जंगलात, त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले.

१५ हजार सापांना जीवदान देणारे धाडसी सर्पमित्र

या धाडसी कृतीमुळे एक दुर्मिळ आणि अतिविषारी वन्यजीव वाचला, तसेच परिसरातील नागरिकांचा संभाव्य धोका टळला आहे. सर्पमित्र रघुनाथ पाटील यांच्या धैर्याचे, शांततेचे आणि वन्यजीव संवर्धनातील योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून साप पकडण्याची कला आत्मसात केलेले रघुनाथ पाटील हे आज साळवण पंचक्रोशीत वन्यजीवप्रेमी म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या दोन दशकांत तब्बल १५ हजारहून अधिक सापांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या कार्यामुळे 'साळवण पंचक्रोशीतला सर्पमित्र' म्हणून त्यांची ओळख अधिकच बळकट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT