डॅनियल काळे
कोल्हापूर : कोल्हापूर शहर सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे. पर्यटन स्थळे, रुग्णालये, उद्याने, शाळा-कॉलेज परिसर असो की, शहरातील मुख्य रस्ते, मोकळ्या जागा असा सर्वच भाग आता टपर्या, हातगाड्या आणि अनधिकृत खोक्यांनी वेढला आहे. नागरिक चालतील तरी कुठून? वाहने सरळ धावतील तरी कुठून? कोल्हापूरचा श्वास या अतिक्रमणांनी अक्षरशः गुदमरत चालला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे या विभागाचे नाव अतिक्रमण विभाग असे ठेवले, तर वावगे वाटणार नाही. वरिष्ठ अधिकारी तर अशी कटकटीची खाती आपल्याकडे नकोच म्हणत आहेत. त्यांना मलईदार खात्यामध्ये इंटरेस्ट आहे. अतिक्रमण हटाओच्या मोहिमांमध्ये ते रस घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे अतिक्रमणे फोफावत आहेत.
रंकाळा, सीपीआर, महावीर गार्डन, महावीर कॉलेज परिसर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी टपर्यांचा अक्षरशः पूर आला आहे. या ठिकाणी केवळ वाहतूक कोंडीच नाही, तर परिसराचे सौंदर्यदेखील हिरावले गेले आहे. रस्त्याच्या कडेने टाकलेल्या पांढर्या पट्ट्यांमध्ये फेरीवाल्यांना जागा दिली असली, तरी आता हे विक्रेते त्या सीमांनाही धुडकावत थेट रस्त्यांवर उतरले आहेत.
ताराबाई रोड, महाद्वार रोड, जोतिबा रोड, माळकर तिकटी ते मटण मार्केट या प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण इतकं वाढलं आहे की, वाहनचालकांसह पादचारी नागरिकांचीही दमछाक होते. केबिन, हातगाड्या, विक्री साहित्य, गिर्हाईकांची गर्दी या सर्वामुळे श्वास कोंडल्यासारखी स्थिती होत आहे. रस्ते हे वाहतुकीसाठी आणि चालण्यासाठी असतात की बाजारासाठी, हाच प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे. ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक आहेत. प्रत्येक रस्त्यावर हेच चित्र आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात सुमारे 7,000 अधिकृत फेरीवाले आहेत, ज्यांच्याकडे बायोमेट्रिक कार्ड आहे. प्रत्यक्षात प्रत्येक अधिकृत फेरीवाल्याच्या शेजारी 20 ते 25 अनधिकृत फेरीवाले उभे आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात खोकी, हातगाड्या आणि टपर्यांची वाढ अनियंत्रित झाली आहे. निर्बंध काळापासून शहरात फेरीवाले वाढले आहेत.