कोल्हापूर : ऐन दिवाळीत कोल्हापुरात पावसाची बॅटिंग सुरू आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सोमवारी हलक्या सरींनी हजेरी लावली होती; मात्र मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास शहरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यानंतर दुपारी तीनपासून साडेतीनपर्यंत जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापार्यांची तारांबळ उडाली. रात्री 8 च्या सुमारास पुन्हा शहरात धुवाँधार पाऊस सुरू झाला. शहरात घरोघरी लक्ष्मीपूजन होत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे महिला व बालगोपाळांचा हिरमोड झाला.
सकाळपासून बाजारपेठांमध्ये उत्सवी वातावरण होते. लक्ष्मीपूजन निमित्ताने घराघरांत स्वच्छतेची लगबग, सजावट, रांगोळ्या आणि दिव्यांनी उजळलेले अंगण दिसत होते. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती. फुले, पूजेचे साहित्य, रांगोळी, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिक रस्त्यांवर होते. फेरीवाल्यांनीही मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लावले होते. मात्र अचानक आलेल्या जोरदार सरींनी नागरिकांची एकच तारांबळ सुरू झाली. दिसेल त्या ठिकाणी आडोसा घेण्यासाठी लोकांची धावपळ सुरू होती; तर फेरीवाल्यांची साहित्य झाकण्यासाठी कसरत झाली.
पावसामुळे अनेकांनी घराबाहेर लावलेले आकाशदिवे भिजले, रंगीबेरंगी रांगोळ्या विस्कटल्या होत्या. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नागरिक पुन्हा बाजारात आले आणि खरेदीस सुरुवात केली. यामुळे संध्याकाळी बाजारात पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.