कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी धरणफुटीचा धोका ओळखून इशारा देणार्या यंत्रणेविषयी केलेल्या संशोधनाला जर्मन पेटंट मंजूर झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात धरणभंग व पूर आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.
विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील संशोधक शुभम गिरीगोसावी, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयातील प्रा. परेश मट्टीकल्ली, सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील डॉ. गणेश न्हिवेकर आणि विद्यापीठाच्या नॅनो विज्ञान व तंत्रज्ञान स्कूलचे डॉ. तुकाराम डोंगळे यांनी या संदर्भातील संशोधन केले. संशोधकांनी ‘अॅन इंटिग्रेटेड सिस्टीम फॉर दि डिटेक्शन ऑफ डॅम बि—चेस, अर्ली वॉर्निंग अँड इव्हॅक्युएशन असिस्टन्स’ या शीर्षकाने अभिनव संशोधन केले.
अत्याधुनिक प्रणालीद्वारे धरण फुटीचा धोका लवकर ओळखता येतो. त्याद्वारे नागरिकांना तत्काळ इशारा देणे व नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरास मदत करणे याबाबी तातडीने करता येऊ शकतात. सॉफ्टवेअरच्या मदतीने धरणफुटीनंतरचे परिणाम व स्थलांतर याविषयी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. याद्वारे लोकांना सूचना देऊ शकतो. योग्य जागी जाण्यासंदर्भात सूचना देऊ शकतो. या संशोधनाला जर्मन सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. प्रकल्प संशोधक शुभम गिरीगोसावी यांनी मॉडेलचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रात्यक्षिक सादर केले आहे. या अभिनव प्रणालीला विविध तज्ज्ञ संस्थांकडून प्रतिसाद मिळत आहे. या कार्यासाठी त्यांना दोन राष्ट्रीय व एक आंतरराष्ट्रीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. संशोधकांचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
धरणभंग व पूर आपत्ती व्यवस्थापन व पूर्वसूचना याचा वापर करून हे मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल कोणत्याही धरणासाठी वापरू शकतो. आयुष्यमान संपत आलेली धरणे व भूंकप प्रवण क्षेत्रातील धरणे, हवामान बदलाच्या अनुषंगाने या मॉडेलचा उपयोग सर्वत्र होऊ शकतो.शुभम गिरीगोसावी, संशोधक, शिवाजी विद्यापीठ