Kolhapur leopard attack
कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यातील परळेनिनाई येथे आज (दि.१९) सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रखूबाई निनू कंक (वय ७०) आणि निनू यशवंत कंक (वय ७५) अस या हल्ल्यात ठार झालेल्या दाम्पत्याच नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण शाहूवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील निनाई परळीजवळ असलेल्या भेंडवडे गावात एका वृद्ध पती-पत्नीचा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावाबाहेर असलेल्या जंगल भागात या दोघांचे मृतदेह आढळून आले. विशेष म्हणजे, वन्य प्राण्याने मृतदेहाचे हात आणि पाय खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे हा हल्ला अतिशय हिंस्त्र स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट होते.
या घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. नेमक्या कोणत्या वन्य प्राण्याने हा हल्ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभाग अधिक तपास करत आहे.