Kabanur Gram Panchayat Shobha Powar
कबनूर : कबनूर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच आणि सदस्या शोभा शंकर पोवार यांना सदस्यपदावरून पदच्युत करण्याचा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) यांनी सोमवारी (दि.६) दिला आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या निर्णयाबाबत विचारले असता पोवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा निर्णय राजकीय आकसातून घेतला गेला आहे. काही जणांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले असून मी या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.”
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, कबनूर येथील रहिवासी रियाझ चिकोडे यांनी माजी सरपंच शोभा पोवार यांच्यावर तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, शोभा पोवार यांनी बांधकाम परवाना देताना अधिकारांचे उल्लंघन करून नियमबाह्यरीत्या कामकाज केले आहे. त्यांनी स्वतः 20 वर्षांपासून राहत असलेल्या घराचा बांधकाम परवाना ग्रामसेवकांच्या संगनमताने मंजूर करून घेतला, तसेच ग्रामपंचायतीच्या नियमित कामकाजाची माहिती देण्यात सातत्याने टाळाटाळ केली.
या तक्रारीवर विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अंतर्गत कार्यवाहीसाठी निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी शोभा पोवार यांना ग्रामपंचायतीच्या उर्वरित कालावधीसाठी सदस्यपदावरून पदच्युत करण्याच निर्णय दिला.
कबनूर ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत 15 जानेवारी 2026 रोजी संपत आहे. केवळ तीन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना पोवार यांना पद गमवावे लागल्याने हा विषय सत्ताधारी गटात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.