कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर मध्यवर्ती गंगावेश येथील गजबजलेल्या बाजारपेठेत शाहू उद्यान प्रवेशद्वारालगत मंगळवारी सकाळी काळजाचा ठोका चुकविणारा थरार घडला. चालकाचा ताबा सुटलेली भरधाव मोटार बाजारात गर्दीत घुसून झालेल्या भीषण दुर्घटनेत आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला; तर वयोवृद्ध महिलेसह तिघेजण गंभीर जखमी झाले. सुशीलाबाई कृष्णात पाटील (55) असे मृत महिलेचे नाव आहे. बेबीताई हिंदूराव पाटील (76, देवाळे, ता. करवीर), शंकर मच्छिंद्रनाथ गोसावी (69, लक्षतीर्थ, ता. करवीर) जखमी झाले.
जखमींवर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मध्यवर्ती गंगावेश येथील भर बाजारपेठेत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. भाजीपाला विक्रेते, स्टॉलधारक, नागरिकांसह मृत आणि जखमींच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. वरिष्ठ अधिकारी, पोलिस, अग्निशमन दल जवानांसह भाजीपाला विक्रेत्यांनी धाव घेऊन बचाव कार्यात मदत केली. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सुशीलाबाई पाटील यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला; तर बेबीताई पाटील, शंकर गोसावी यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. आणखी एका जखमीचे नाव समजू शकले नाही. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवासी वडाप करणाऱ्या मोटार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे घडलेल्या भीषण अपघातात सुशीला पाटील यांचा मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीय, नातेवाईकांनी केलेला आक्रोश काळजाला भिडणारा होता. आसुर्ले येथील ग््राामस्थांनीही रुग्णालयात गर्दी केली. दिवाळीच्या तोंडावर महिलेचा मृत्यू झाल्याने आसुर्लेसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. मोटारचालक उमेश बाळासाहेब मस्कर (51, रा. मस्कर गल्ली, शिंगणापूर, ता. करवीर) याच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, शहरातील गंगावेश येथील शाहू उद्यान प्रवेशद्वारासमोरील परिसरात मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे बाजार भरला होता. त्यात दिवाळी खरेदीस आलेल्या नागरिकांसह महिलांची प्रचंड ग होती. करवीर, पन्हाळा, राधानगरी,भुदरगड तालुक्यांतील विक्रेत्यांची गर्दी होती. आसुर्ले येथील सुशीलाबाई पाटील उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ दही, लोणी विक्रीसाठी बसल्या होत्या. सकाळी 11 वाजता सुशीलाबाईंसह काही भाजीपाला विक्रेत्या महिला जेवण करण्यासाठी रस्त्याकडे पाठ करून बसलेल्या होत्या.
महिलांसमोर केळी विक्रीचा गाडा थांबलेला होता. बाजारात आज सकाळी वर्दळ वाढलेली होती. याचवेळी शाहू उद्यानाच्या दिशेने काळी-पिवळी प्रवासी वडाप करणारी मोटार येत असल्याचे निदर्शनास येताच भाजीपाला विक्रेत्यांसह नागरिकांनी आरडाओरड केली. अवघ्या काही क्षणार्धात भरधाव मोटारीने केळाची विक्री करणाऱ्या ढकलगाडीला जोरात उडविले. त्याच क्षणी जेवणासाठी बसलेल्या महिलांना मोटारीने ठोकरले. भरधाव वेगामुळे महिला चिरडल्या. त्यात सुशीलाबाई पाटील रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या तर अन्य तिघेजण गंभीर जखमी होऊन रस्त्यावर तडफडत पडले होते. उद्यान प्रवेशद्वारालगत झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. सुशीलाबाईसह अन्य जखमींना बाहेर काढून त्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ अन्य पथकांनीही धाव घेतली. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, यांच्यासह फॉरेन्सिक लॅबचे पथक, अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर भीषण अपघातात आसुर्ले येथील महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
शाहू उद्यानजवळ मंडईत नेहमीच प्रचंड गर्दी असते. गंगावेश चौकात मंडईत प्रवेश करणाऱ्या मार्गावर तर पाय ठेवायलाही जागा नसते. अशातच भरधाव मोटार गर्दीत घुसली आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. मोटार आपल्या दिशेने येताना पाहून अनेकांनी पळ काढला. पथारी पसरून भाजी विक्री करणाऱ्या आणि घेणाऱ्या ग्राहकांनीही वाट दिसेल तिकडे धाव घेतली. प्रसंगावधान राखल्यामुळे किमान 8 ते 10 जणांचे जीव वाचले.