वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था आणि राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1008 कोटी रुपयांच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांतून (पंप स्टोरेज) 240 मेगावॅट वीजनिर्मिती होणारा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील सहकारातील हा पहिलाच प्रकल्प असून तो कोदाळी धरण (ता. चंदगड) आणि केंद्रे (ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग) येथे साकारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे मंगळवारी केली. या प्रकल्पातून 300 जणांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई येथे विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात हा सामंजस्य करार झाला. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. डॉ. विनय कोरे, नवशक्तीचे अध्यक्ष एन. एच. पाटील, ज्योतिरादित्य कोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पश्चिमी घाटामुळे पंप स्टोरेज निर्मितीसाठी अतिशय चांगली संधी आहे. वारणा समूहाने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. हा जलविद्युत प्रकल्पही ते गतीने पूर्ण करतील. भविष्यातील विजेचा वाढता वापर लक्षात घेता पंप स्टोरेज आवश्यक ठरणार असून त्याची वीज गरजेनुसार आणि आवश्यक तेवढ्या प्रमाणात वापरता येते. भविष्यातील पर्यायी व्यवस्था म्हणून मोठ्या प्रमाणात पारेषणात गुंतवणूक करून 2035 साली कॉरिडॉर उभे करावे लागणार आहे. त्यादृष्टीने शासन पारेषणात एक लाख कोटींची गुंतवणूक करत आहे. या सर्वात पंप स्टोरेजची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आ. डॉ. विनय कोरे म्हणाले, महाराष्ट्राने 2023 साली आणलेले अक्षय ऊर्जा धोरण विशेष उपयोगी ठरणारे असून राज्याच्या हितासाठी दूरगामी परिणाम करणारा आणि काळाच्या पुढचा विचार या धोरणात झालेला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग आणि पर्यावरण पूरक असलेल्या उदंचन जलविद्युत प्रकल्प वारणा समूह गतीने उभारण्यास प्राधान्य देईल. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, श्रीकर परदेशी, वारणा नवशक्तीचे अध्यक्ष एन. एच. पाटील, ज्योतिरादित्य कोरे, समीत कदम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.