कुरळप : संदीप परीट
सासू-सुनेचं नातं आई आणि लेकीचं झालं तर हजारो संसार सुखाचे होतील; पण त्यासाठी सुनेचं मन लेकीचं आणि सासूचं मन आईचं व्हायला हवं. ते तसं झालं की, सासूला वाचवण्यासाठी सून जीवाचं रान करते. मायादेवी कामेरीकर यांनी हे दाखवून दिले. त्या मुलुंड येथे पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सासूच्या उपचारांसाठी ३८ तोळे सोने आणि शेतजमिनीवर पाणी सोडले; पण सासूला वाचवलं.
वाळवा तालुक्यातील कुरळप गावातील हे उदाहरण सर्वांसाठी आदर्शवत आहे. सासू आजारातून बरी व्हावी म्हणून तब्बल १५० किलोमीटर पायी चालत नवस फेडणाऱ्या मायादेवी सुधीर कामेरीकर यांची ही कथा आहे. वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांच्या आई आकाशी बापूसो। कामेरीकर काही महिन्यांपासून यकृताच्या आजाराशी झुंज देत होत्या. डॉक्टरांनीही आशा सोडली होती; पण माझ्याजवळ शेवटचा रुपया असेपर्यंत मी सासूला काही होऊ देणार नाही, असा निश्चय मायादेवी यांनी केला.
आकाशी यांच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी मोठा खर्च सांगितला. मायादेवी यांनी कोणासही काही न सांगता स्वतःच्या ३८ तोळे सोन्यावर कर्ज काढले. स्वतःच्या नावावर असणारी जमीन विकली. स्वतःच्या पगारावर ६० लाख कर्ज काढून त्या पैशातून सासूचे तातडीचे उपचार सुरू केले. सासुबाई बऱ्या झाल्या; पण बँकेत ठेवलेले ३८ तोळे सोने न सोडवल्याने मोडीत निघाले. जमीन गेली. कर्जाचा डोंगर वाढला. सर्व परत येईल; पण सासुबाई वाचल्या हे लाखमोलाचे, अशी भावना मायादेवींच्या बोलण्यातून जाणवले.