उजळाईवाडी : गोकुळ शिरगाव येथील कणेरीवाडीचा सिमेंट व्यापारी वीरेंद्रकुमार कृष्णा पाटील याला हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवत असताना बंदुकीच्या धाकाने कारमध्ये बसवून अपहरण केल्याप्रकरणी निपाणी येथील सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.
प्रवीण नामदेव चव्हाण (38), रोहित रमेश वैद्य (32) सौरभ रमेश वैद्य (29) सिद्धार्थ मनोज वैद्य (सर्व रा. कामगार चौक निपाणी), राहुल राजू मातीवडर (25, शिवाजी चौक, निपाणी), कुणाल अनिल जाधव (दिवेकर कॉलनी, निपाणी) या 6 जणांवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून चौघांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
वीरेंद्र पाटील व त्याचा मित्र राहुल एकनाथ कांबळे (रा. गिरगाव) हे मंगळवारी (दि. 7) गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील एका हॉटेलमध्ये दुपारी दोन वाजता जेवत असता संशयित सहाजण तिथे आले. पाटील याला शिवीगाळ करत हॉटेलच्या बाहेर नेऊन कारमध्ये बळजबरीने बसवून कागल तालुक्यातील तमनाकवाडा डोंगरात नेले. तिथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांधून बंदुकीचा धाक दाखवत आत्ताच आत्ता पैसे दे, असे म्हणत मारहाण केली. याची माहिती मिळतात गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांची सुटका केली.
याप्रकरणी पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वीरेंद्रकुमार पाटील याच्यावरही फसवणूक केल्याचे गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.