कागल : येथे 80 फुटांवर पाळण्यात अडकलेल्या 18 जणांना रेस्क्यू ऑपरेशन करून सुखरूप उतरविण्यात आले. 
कोल्हापूर

Kagal Ferris Wheel Stuck | पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 18 जणांना सुखरूप उतरवले

कागल उरुसातील जॉईंट व्हिल पाळण्याचा थरार; महापालिका, पोलिस, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रयत्न यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

बा. ल. वंदुरकर

कागल : येथील गैबीपीर गहिनीनाथ उरुसानिमित्त आलेल्या जॉईंट व्हिल पाळण्यात तांत्रिक बिघाड झाल्याने पाळण्यात बसलेले 18 जण 80 फूट उंचावर राहिले. पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनंतर सर्वांना सुखरूपपणे खाली उतरविण्यात यश आले. शुक्रवारी रात्री हा थरार घडला. यासाठी कोल्हापूर महापालिका, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली.

येथील उरुसात आलेल्या जॉईंट व्हिल पाळण्याचे नागरिकांना आकर्षण असल्याने महिला व लहान मुले असे 18 जण शुक्रवारी (दि. 24) रात्री नऊच्या दरम्यान पाळण्यात बसले. 80 फूट उंच गेल्यानंतर पाळण्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि 18 जण हवेतच लटकून राहिले. पाळण्याच्या मालकांनी आपले तज्ज्ञ कर्मचारी व्हिलवर असलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी पाठवले. पाळणा खाली घेण्याकरिता अनेक वेळा प्रयत्न केले; मात्र पाळणा खाली येत नव्हता. पाळण्यातील लहान मुले आणि महिलांनी आक्रोश सुरू केला होता. कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल, रेस्क्यू पथक, नगरपालिकेचे अग्निशामन दल, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

दीडशे फूट लांब जाणारी क्रेन

कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर रणभिसे यांनी जिल्हाधिकार्‍यांची रात्री उशिरा विशेष परवानगी घेऊन सुमारे दीडशे फूट लांब जाणारी क्रेन तातडीने कागलकडे रवाना केली आणि सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन!

दोघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी अठरा लोकांच्या जीवितास व त्यांच्या व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी दोन पाळणा चालकांवर गुन्हा दाखल केला. बाळासो सीताराम सातपुते (रा. आगाशिवनगर, कराड) व व्यवस्थापक भरत शिवाजी यादव (रा. मुडशिंगी) अशी त्यांची नावे आहेत.

सर्व विभागांच्या अधिकार्‍यांची तत्परता

80 फूट उंच असलेल्या व्हिलमध्ये अडकलेल्या नागरिकांना क्रेनच्या साह्याने खाली घेण्यासाठी दोन ते तीन वेळा ट्रायल घेण्यात आली. त्यानंतर दोन-तीन नागरिकांना खाली घेऊन हे रेस्क्यू ऑपरेशन तब्बल पाच तासांच्या थरार नाट्यानंतर संपुष्टात आले. यावेळी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी तत्परता दाखवल्याने कोणतीही जीवितहानी न होता सर्वजण सुखरूप जमिनीवर उतरले.

पाळणामालकांकडे परवानाच नाही

नगरपालिकेने आवश्यक ते परवाने तत्काळ घेण्याबाबत तोंडी सूचना दिलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे आणि नगरपालिका यांच्या संयुक्तपणे पाळण्यांना परवाना देणे आवश्यक असताना यापैकी कोणताही परवाना पाळणा मालकाकडे नव्हता. आता त्यांच्यामागेे परवान्याचा ससेमिरा लावण्यात आलेला आहे.

कोल्हापूर मनपाचे टर्न टेबल लॅडर व अग्निशमनचे जवान ठरले ‘देवदूत’

कागल येथील उरुसामध्ये 80 फूट उंचावर जाऊन थांबलेल्या आकाश पाळण्यातल्या ‘त्या’ 18 जणांना वाचविण्यात महत्त्वाची भूमिका कोल्हापूर महापालिकेच्या टर्न टेबल लॅडर (फिरता जिना) या अत्याधुनिक वाहनाने आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बजावली. उंच शिडी आणि बास्केटच्या सहाय्याने हे मदतकार्य करण्यात आले. उंचावर अडकलेल्या लोकांसाठी महापालिकेचे टर्न टेबल लॅडर हे वाहन आणि अग्निशमन दलाचे जवान देवदूतच ठरले. शुक्रवारी रात्री दहा वाजता ‘टर्न टेबल लॅडर’ हे वाहन घटनास्थळी दाखल झाले. उंच शिडी आणि बास्केटच्या साहाय्याने जवानांनी एकामागून एक सर्व नागरिकांची सुटका केली आणि सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद झळकला. मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत खोत, ओंकार खेडकर, जयवंत खोत, वाहनचालक अमोल शिंदे, फायरमन प्रमोद मोरे, अभय कोळी यांनी ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT