कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक येथून एसटी बसने बेळगावकडे जाणार्या जैन्याळ (ता. कागल) येथील महिला प्रवाशाचे 3 लाख 20 हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. स्वाती विनोदकुमार शशी (वय 44) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
स्वाती शशी बेळगावकडे जाणार्या एसटीमध्ये चढत असतानाच चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पर्समधील सोन्याचे मंगळसूत्र, हार लंपास केला. हा प्रकार निदर्शनास येताच महिलेने एसटी चालक, वाहक यांच्याकडे तक्रार केली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महिन्यापासून सराईत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दिवाळी सणाच्या काळात अनेक महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने, रोकड लंपास होण्याचे प्रकार घडले आहेत. बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी व्यापक शोधमोहीम राबविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.