Rankala Lake | रंकाळा तलावात पुन्हा जलपर्णीचा शिरकाव 
कोल्हापूर

Rankala Lake | रंकाळा तलावात पुन्हा जलपर्णीचा शिरकाव

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरातील पर्यटनाचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाच्या सौंदर्याला बाधा ठरणार्‍या जलपर्णीचा पुन्हा शिरकाव होऊ लागला आहे. रंकाळा परिसरातील तांबट कमानीपासून ते राजघाटाच्या पायर्‍यांपर्यंत ठिकठिकाणी जलपर्णीचे पुंजके दिसायला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हजारो लिटर सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत आहे. त्यामुळे रंकाळ्याला जलपर्णीचा विळखा बसत असून, वेगाने वाढत असलेल्या जलपर्णीमुळे रंकाळ्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

रंकाळ्यातील पाण्याला प्रदूषणाचा फटका बसल्याने जलपर्णीने डोके वर काढले आहे. जलपर्णीची वाढ ही सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे होत असते. रंकाळ्यात थेट मिसळत असलेल्या सांडपाण्यावर महापालिका प्रशासनाचा अंकुश नसल्याने रंकाळा जलपर्णीच्या विळख्यात अडकत आहे. सांडपाणी मिसळत असलेल्या जागांवर महापालिकेने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जलपर्णीची वाढ झपाट्याने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एका ठिकाणी उगम होणारी ही जलपर्णी वाढत जात असून, त्याचे पुंजके तयार होत आहेत. पाण्याच्या प्रवाहासोबत ते तांबट कमानीपासून ते राजघाटाच्या पायर्‍यापर्यंत पसरत चालले आहेत. या जलपर्णीला विशिष्ट प्रकारचा वास असल्याने जसजशी ही जलपर्णी वाढत जात आहे, तशी परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे भविष्यात जलपर्णीचा धोका वाढल्यास परिसरातील सार्वजनिक आरोग्यही धोक्यात येणार आहे.

रंकाळा तलाव लवकरात लवकर जलपर्णीमुक्त करावा

सध्या जलपर्णीचे प्रमाण कमी आहे. मात्र, वाढीचा वेग पाहता महापालिकेने लवकरात लवकर जलपर्णी काढण्याची मोहीम सुरू करावी तसेच जलप्रदूषण दूर करण्यासाठी उपाय करावेत, अशी मागणी रंकाळा प्रेमींकडून केली जात आहे.

10 वर्षांपूर्वी रंकाळ्याला घातला होता विळखा

10 ते 12 वर्षांपूर्वी जलपर्णीची कीड रंकाळा तलावाला लागली होती. ही वाढ इतकी झपाट्याने झाली होती की, संध्यामठापासून संपूर्ण रंकाळ्यावर जलपर्णीचे आच्छादन पसरले होते. एक वेळ अशी आली होती की, रंकाळा तलाव की मैदान असे चित्र दिसले होते. पुन्हा रंकाळ्यात दिसू लागलेल्या जलपर्णीमुळे रंकाळाप्रेमी तसेच भागातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा रंकाळ्याचा श्वास जलपर्णीमुळे कोंडला जाईल, याची भीती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT