राजेंद्र जोशी
कोल्हापूर : जागतिक पातळीवर भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखले जाते. जगातील औषधांच्या एकूण निर्यातीच्या 30 टक्के औषधांची निर्यात भारतातून होते. त्याखेरीज भारताच्या देशांतर्गत बाजारपेठेचे आकारमान आता वार्षिक दोन लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे; पण त्याचबरोबर गेल्या काही दशकांत बनावट औषधे, दर्जाहीन औषधनिर्मितीचे भारत केंद्र बनू पाहत आहे.
देशात अन्न व औषध प्रशासनामार्फत नियमित पद्धतीने प्रत्येक महिन्याला औषधांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात. प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येतात. परंतु, अलीकडे या नमुन्यांपैकी बनावट आणि दर्जाहीन औषधे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. ही वाढ इतकी गंभीर आहे की, एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, जगातील एकूण बनावट आणि दर्जाहीन औषधांमध्ये भारताचा वाटा सुमारे 51 टक्क्यांवर आहे. यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की होते, निष्पापांचे जीव जातात आणि भारतीय औषध उद्योगाकडे पाहण्याचा जगाचा द़ृष्टिकोनही बदलतो आहे; मग आम्ही दर्जाविषयी आमची पारंपरिक परिमाणे बदलणार केव्हा? जोपर्यंत बनावट व दर्जाहीन औषधांच्या निर्मितीबद्दल उरात धडकी बसावी, इतपत धाक निर्माण करणारा कायदा आणि अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत बनावट, दर्जाहीन औषधाचे संकट दूर होणे अशक्य आहे.
बाजारपेठेमध्ये एखाद्या उत्पादनाची निर्मिती केली की, त्याच्या दर्जाची तपासणी त्रयस्थांमार्फत होणे आवश्यक असते. औषधांच्या दर्जाच्या बाबतीत तर ही खबरदारी आणखी जोखमीची असल्याने त्याविषयी दर्जा नियंत्रणाची काटेकोर प्रणाली असणे आवश्यक आहे. परंतु, भारत हा जगाच्या पातळीवर एकमेव देश असावा, जिथे औषधांच्या दर्जा नियंत्रणाची जबाबदारी उत्पादक कंपन्यांवरच सोपविण्यात आली आहे. याचा अर्थ ज्यांनी उत्पादन करायचे, त्यांनीच आपल्या उत्पादनाचा दर्जा ठरवायचा. त्यासाठी औषध कंपन्यांना प्रयोगशाळा स्थापित करण्याविषयी कायद्याने काही नियम आहेत. परंतु, त्याच्या अंमलबजावणीकडेही लक्ष नाही आणि कंपन्यांनी विशिष्ट औषधांच्या बॅचचा पाठविलेला दर्जाविषयक अहवाल पाहण्याचा प्रशासनाला वेळ नाही. यामुळे नागरिक रामभरोसे औषधे घेतात. औषध दर्जेदार असेल, तर गुण येतो आणि दर्जाहीन असेल, तर रुग्णाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.
बनावट आणि दर्जाहीन औषधांमुळे रुग्णांचा मृत्यू होणे हे एक द़ृश्य स्वरूपातील गंभीर प्रकरण असले, तरी अशा औषधांच्या सेवनाने रुग्णांच्या प्रकृतीवर होणारे विपरीत परिणाम हे त्याहून गंभीर प्रकरण आहे. यामध्ये रुग्णाचा तत्काळ मृत्यू समोर येत नसला, तरी तो दररोज कणाकणाने मरत असतो, ही वस्तुस्थिती आहे. दर्जाहीन औषधांमुळे रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत जाते आणि एका क्षणी रुग्ण जगाचा निरोप घेतात. व्यवस्थेने ‘रुग्णाच्या प्रकृतीने औषधोपचाराला साथ दिली नाही,’ असा रुग्णाच्या मृत्यूवर शिक्का मारण्याची सोय केली असली, तरी यातील बहुतेक मृत्यू दर्जाहीन औषधांमुळे होतात; पण त्याची मोजदाद करण्याची व्यवस्था देशातील या घडीला उपलब्ध नाही. (क्रमशः)