कोल्हापूर : आईकडून बाळाला होणारा हेपेटायटिस बी (एचबीव्ही) विषाणूचा संसर्ग हा एक गंभीर धोका असून, जन्मानंतर अवघ्या 24 तासांच्या आत दिलेली लस बाळासाठी जीवनदायी ठरू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. संसर्गामुळे बालकांमध्ये यकृत विकृती, सिरोसिस व हेपॅटोसेल्युलर कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.
जन्मावेळी लसीकरण केल्याने एचबीव्ही संक्रमणाचा धोका कमी
एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांची तपासणी आणि अँटिव्हायरल उपचार गरजेचे
70 ते 90 टक्के संक्रमणाची शक्यता लसीकरणाशिवाय
एचबीव्ही पॉझिटिव्ह मातेकडून बाळाला संसर्ग होण्याची शक्यता 70 ते 90 टक्के असते. विशेषतः ज्या मातांमध्ये विषाणुजन्य प्रमाण अधिक आहे किंवा त्या एचबीईएजी पॉझिटिव्ह असतात, त्या प्रकरणांमध्ये मदर टू चाईल्ड टान्समिशनचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे गर्भवती महिलांची योग्य तपासणी, समुपदेशन आणि उपचार आवश्यक ठरतात. जन्मानंतर 24 तासांच्या आत बाळाला एचबीव्हीचा पहिला डोस देणे हे संक्रमण टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याशिवाय उच्च धोका असलेल्या बाळांना एचबीआयजी ही रोगप्रतिकारक उपचार प्रणालीही दिली जाते, तरीही बाळांना संसर्ग होण्याची शक्यता राहते. त्यामुळे आईच्या गर्भावस्थेतच अँटिव्हायरल औषधोपचार करणे हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो.
हेपेटायटिस बी आजार अनेकदा लक्षणांविना राहतो आणि त्यामुळे तो सायलेंट किलर ठरतो. यामुळे नवजात मुलांमध्ये लसीकरण हा एक जीवनवाचक उपाय ठरतो. जागतिक हेपेटायटिस दिनाच्या निमित्ताने सर्व गर्भवती महिलांनी नियमित तपासणी करून लसीकरणाची योग्य वेळ साधावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) 2009 पासून हेपेटायटिस बी रोखण्यासाठी मदर-टू-चाईल्ड ट्रान्समिशनवर भर देत आहे. त्यानुसार सर्व बाळांना लसीकरणाचे किमान तीन डोस द्यावेत आणि एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांची वेळेवर तपासणी करून आवश्यक त्या औषधोपचारांची अंमलबजावणी करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.
हेपेटायटिस बीचे संक्रमण आईकडून बाळाला तसेच रक्ताद्वारे, लैंगिक संपर्कातून होते. प्रसूतीपूर्व आणि नंतर आईमध्ये एचबीव्ही या विषाणूचा संसर्ग सापडल्यास बाळाचे लसीकरण केले जाते. त्याप्रमाणे संबंधित महिलेच्या जोडीदाराची (पती) तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये जोडीदारालाही संसर्गाची बाधा झाली असल्यास त्यालाही तीन डोस देऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात.डॉ. सतीश पत्की, स्त्री रोगतज्ज्ञ