कोल्हापूर : मंत्रिपद असतानाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि त्यानंतर गोकुळचे अध्यक्षपदही घरात आल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विश्वासातील नवीन अध्यक्ष कोण याची चर्चा आता सुरू झाली असून नवा अध्यक्ष कागलचा असणार की बाहेरचा, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा बँके प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी सन 2015 मध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबवत तसेच विविध योजना राबवून प्रशासक काळात तोट्यात असणारी बँक फायद्यात आणली. ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. केवळ शेतकर्यांपुरती ही बँक मर्यादित न राहता तिला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. गेल्या दहा वर्षांपासून ते बँकेचे अध्यक्ष आहेत. गोकुळमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे गोकुळ अध्यक्षपदाची माळ मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली. त्यानंतर बाजार समितीचे सभापतिपदही कागलमध्येच ठेवण्यात आले. याची चर्चा होऊ लागल्यामुळे मुश्रीफ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचे सूतोवाच मुश्रीफ यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात केले. त्यामुळे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयासाठी मुश्रीफ यांनी सांगलीच का निवडली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मुश्रीफ यांनी यापूर्वी देखील जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत विचार केला होता. परंतु संचालकांनी त्याला विरोध केला. आपणच अध्यक्ष राहावे, असा आग्रह धरला होता त्यावेळी मुश्रीफ यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा थांबला होता. आता मुश्रीफ यांच्या राजीनाम्यावर संचालक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.