कोल्हापूर : ‘गोकुळ’ने आजपर्यंत कोणत्याही दूध संस्थेची 40 टक्के डिबेंचर कपात केलेली नाही. 1993 पासूनच संस्थांना डिबेंचर्स दिले जात असून, संस्था सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्यासाठी ही योजना राबविली जाते. सन 2024-25 मध्ये संस्थांना प्रतिलिटर सरासरी 1.25 रुपयेप्रमाणे डिबेंचर्स दिले आहे. डिबेंचर्स व दर फरकाची सर्व माहिती 7 ऑगस्ट 2025 रोजीच्या खाते उतार्यातून संस्थांना देण्यात आली आहे. असे पत्रक ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दिले आहे.
डिबेंचर कोणतीही नवीन योजना नसून, सन 1993 पासून राबविण्यात येत आहे. दरवर्षी 31 मार्च रोजी ताळेबंद वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला जातो. त्यानुसार सन 2024-25 चा ताळेबंद सभेत एकमताने मंजूर करण्यात आल्यामुळे त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ‘गोकुळ’ला सन 2024-25 या आर्थिक वर्षात 215 कोटी 87 लाख इतका व्यापारी नफा झाला आहे. 136 कोटी रुपये अंतिम दूध दर फरक म्हणून वितरित करून देशातील क्रमांक एकचा दूध संघ म्हणून ‘गोकुळ’ने ओळख मिळवली आहे. 2024-25 मध्ये ‘गोकुळ’ने म्हैस दूध उत्पादकांना सरासरी 2.45 रुपये आणि गाय दूध उत्पादकांना सरासरी 1.45 रुपये प्रतिलिटर याप्रमाणे 136 कोटींचा अंतिम दर फरक दिला आहे. या दरात डिबेंचर कपात केलेली नाही. हा दर राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे, असेही या पत्रकात म्हटले आहे.
डिबेंचर योजनेमुळे ‘गोकुळ’ला बँकांकडून कर्ज घेण्याची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे अतिरिक्त व्याजाचा भार दूध उत्पादकांवर पडत नाही. उलट, ‘गोकुळ’कडून डिबेंचर्सवर संस्थांना व्याज दिले जाते. अप्रत्यक्षपणे हा आर्थिक फायदा दूध उत्पादकांनाच मिळतो. या निधीच्या बचतीमुळे ‘गोकुळ’ला सर्वाधिक दूध दर देणे शक्य झाले आहे.