High Returns Fraud | जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधीचा गंडा; फॉरेक्स ट्रेडिंगचा म्होरक्या गजाआड 
कोल्हापूर

High Returns Fraud | जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधीचा गंडा; फॉरेक्स ट्रेडिंगचा म्होरक्या गजाआड

45 दिवसांत दामदुप्पट परतावा; कोल्हापूरसह सीमाभागात फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अवघ्या 45 दिवसांत दामदुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह सीमा भागातील गुंतवणूकदारांना 19 कोटींपेक्षा जादा रकमेचा गंडा घालून पसार झालेल्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील बहुचर्चित फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा म्होरक्या राजेंद्र भीमराव नेर्लीकर (49, रा. हुपरी, हातकणंगले) याला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी गजाआड केले.

मुख्य संशयित राजेंद्रसह मुलगा बालाजी नेर्लीकर याच्याविरुद्ध हुपरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 पासून संशयित फरारी होता. आदमापूर येथील एका हॉटेलमध्ये त्याने वास्तव्य केल्याची माहिती मिळाली. पथकाने छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. इचलकरंजी येथील न्यायालयाने संशयिताला 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.

राजेंद्र नेर्लीकर व मुलगा बालाजी यांनी फॉरेक्स ट्रेडिंग कंपनी स्थापन केली. हुपरीसह कोल्हापूर शहरातही त्याने आलिशान कार्यालय थाटले होते. गुंतवणूक केल्यास 45 दिवसांत दामदुप्पट परतावा देण्याचे त्याने आमिष दाखविल्याने जिल्ह्यासह सीमा भागातील शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मुदतीनंतर मुद्दल, परतावा देण्यास संशयितांनी टाळाटाळ केली. गुंतवणूकदार विनायक पाटील यांच्यासह 38 जणांनी हुपरी पोलिस ठाण्यात नेर्लीकर पिता-पुत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने संशयित बालाजी नेर्लीकरला त्याचवेळी अटक केली होती. मात्र मुख्य संशयित राजेंद्र नेर्लीकर गुन्हा दाखल होताच पसार झाला होता.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातही त्याचा शोध घेण्यात आला. पण पोलिसांना सापडत नव्हता. पथकाने आदमापूर येथील हॉटेलवर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी ही माहिती दिली. नेर्लीकर पिता-पुत्राकडून फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT