कोल्हापूर : जादा परतावा देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घालणार्या बहुचर्चित फॉरेक्स ट्रेडिंगचा जेरबंद म्होरक्या राजेंद्र भीमराव नेर्लीकर याचा साथीदार संशयित सचिन विरूपाक्ष विभुते (वय 39, रा. कोते, ता. राधानगरी) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही नेर्लीकर याने ऑक्टोबर 2024 पासून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह कर्नाटकात आश्रय घेतला होता. फरारी काळातही त्याने साथीदाराच्या मदतीने ट्रेडिंगसाठी गुंतवणूक घेणे सुरूच ठेवले होते. दोन महिन्यांत त्याने दोन ते अडीच कोटीची गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदारांना भाग पाडले होते. या कृत्यात सचिन विभुते याचा सहभाग निष्पन्न झाले होते.
विशेष पथकाने विभुते यास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, त्यास पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे. विभुते याने आदमापूर येथील लॉजवर स्वत:च्या नावे खोली बुक करून नेर्लीकरला राहण्यास दिली होती, अशीही माहिती चौकशीतून पुढे आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले. आर्थिक गुन्हे शाखेने नेर्लीकर व विभुते याची बँक खाती गोठविली आहेत. शिवाय फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीशी संबंधित कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संशयिताच्या मालमत्ताचीही माहिती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.