Fake currency case | कुख्यात टोळ्यांना ‘खाकी’ची साथ; बनावट नोटांचा सर्वत्र सुळसुळाट 
कोल्हापूर

Fake currency case | कुख्यात टोळ्यांना ‘खाकी’ची साथ; बनावट नोटांचा सर्वत्र सुळसुळाट

कोल्हापूर, सांगली, सातारासह सीमाभागात बनावट नोटांची चलती

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : पाचशे, दोनशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून कमाईला सोकावलेल्या कुख्यात टोळ्या पोलीस हवालदाराची साथ मिळाल्याने शिरजोर झाल्या. सराईत गुंडही नोटांची छपाई, वितरण यंत्रणेत सक्रिय झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातील व्यापारपेठेला धक्का बसला आहे. सांगली पोलिसांनी टोळीला जेरबंद केल्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटकात टोळ्यांच्या कारनाम्यांची चर्चा रंगू लागली आहे.

बनावट नोटांच्या तस्करीची चर्चा होती. दैनंदिनी उलाढालीत पाचशे, दोनशेच्या बनावट नोटा आढळत होत्या; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर मिरज येथील पोलीस पथकाने टोळीचा बुरखा फाडला. कोल्हापूर पोलीस दलामधील मोटार वाहन विभागातील चालक तथा पोलीस हवालदार इब—ारसय्यद इनामदार (रा. कसबा बावडा) याच्यासह 5 गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून 1 कोटी किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात यापूर्वी बनावट नोटांची छपाई करून त्या बाजारपेठांमध्ये खुल्लम खुल्ला चलनात आणणार्‍या किमान दोन डझनाहून अधिक सराईत तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या; मात्र केवळ वरिष्ठाकडून पाठ थोपटून घेण्यापुरतीच तपासाची मर्यादा राहिली. परिणामी, टोळ्यांना मोकळे रान मिळत गेले.

बनावट नोटा प्रकरणांचा पर्दाफाश

1) 14 ऑगस्ट 2025 : इचलकरंजीत बनावट नोटांची छपाई करणार्‍या तिघांना अटक; मंगळवार पेठ, परीट गल्ली, गावभाग, भुईनगर शहापूर येथील संशयित जेरबंद. भाड्याने घेतलेल्या खोलीत बनावट नोटा, प्रिंटर, नोटासाठी लागणारा कागद, 500 रुपयांच्या 392 आणि 100 रुपयांच्या 282 अशा 2 लाख 24 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत.

2) 23 जुलै 2025 : गडहिंग्लजमधील एका बँकेच्या एटीएममध्ये बनावट नोटांचा भरणा करणारा तरुण जेरबंद. 17 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत. आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीला. पश्चिम बंगाल-बांगला देशच्या सीमेवरून दोघांना अटक, महाराष्ट्रासह कर्नाटकातील संशयिताचा सहभाग उघड

3) 20 फेब—ुवारी 2025 : कळंबा (ता. करवीर) येथे बनावट नोटांची छपाई. मुख्य संशयित जेरबंद. दिल्ली, मुंबईतील विशेष पथकांची कारवाई. संशयिताच्या खोलीतून ए-4 साईजचे चार पेपर्स, कागदावर 50 रुपये मूल्य असलेल्या आणि छपाई केलेल्या 6 बनावट नोटा, 200 रुपयांच्या चार, तर 500 रुपयांच्या चार छापील नोटा, हाय सिक्युरिटी थ—ेड असलेली रंगीत पट्टी, त्यावर आरबीआय व भारत सरकार छापलेली कागदपत्रेही हस्तगत केली. हॉगकाँगमधून कुरिअरद्वारे पेपर मागविले होते.

4) 11 एप्रिल 2024 : पाचशे रुपयाच्या बनावट नोटांची छपाई करून चलनात खपविणार्‍या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. 7 साथीदार जेरबंद. साडेतीन लाखांच्या बनावट नोटांची छपाई केल्याची संशयिताकडून कबुली. पुण्यातील मुळा नदीत काही बनावट नोटा फेकून दिल्याची कबुली. दोघे संशयित पदवीधर असल्याचेही निष्पन्न झाले होते. ग्राफिक डिझायनरच्या करामतीने बनावट नोटांची छपाई केल्याचे चौकशीत उघड.

5) 8 जानेवारी 2024 : कागल तालुक्यातील फार्म हाऊसवर टोळीच्या कारनाम्याचा भांडाफोड. एक लाखाला 3 लाखांच्या बनावट नोटा. आंतरराज्य टोळीचा सहभाग उघड. घटप्रभा (जि. बेळगाव) येथील एका महिलेसह तिघांना अटक. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात गंडा.

6) करवीर तालुक्यातील आरळे येथे पाचशे, दोनशे रुपयांच्या बनावट नोटांची छपाई करून या नोटा चलनात आणणार्‍या रॅकेटचा जुना राजवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक. संशयिताकडून पाचशे रुपयांच्या 62 बनावट नोटा हस्तगत. मुख्य सूत्रधाराच्या घरावर छापा टाकून नोटा छपाईची यंत्रसामग्री हस्तगत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT