कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर आणि चंदगड मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालेल्या एकूण दहा मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी होणार आहे. दि.23 ते दि.26 या कालावधीत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
कोल्हापूर उत्तर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर पराभूत उमेदवारांनी मिळालेल्या मतदानावर साशंकता व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने मतमोजणी झाल्याचा आक्षेप घेतला होता. या मतदान केंद्रांवरील इव्हीएमची फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती मागणी फेटाळत निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या ऐवजी त्या मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांची पडताळणी करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार या दोन्ही मतदार संघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांवरील इव्हीएमची पडताळणी होणार आहे. या इव्हीएमवर प्रत्येकी 1400 मते टाकली जाणार आहेत. त्यानुसार टाकलेल्या मताप्रमाणेच त्या यंत्रांवर मतदान होते की नाही, हे तपासले जाणार आहे. यानंतर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. याकरिता संबंधित उमेदवार आणि त्यांच्या एका प्रतिनिधीला प्रवेश दिला जाणार आहे. दररोज तीन इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. एका इव्हीएमच्या पडताळणीसाठी सात ते आठ तासांचाही कालावधी लागण्याची शक्यता आहे. याकरिता चार अभियंत्यांचीही नियुक्ती केली आहे.