कृषी क्षेत्रात अवतरतेय ड्रोन युग Pudhari File Photo
कोल्हापूर

कृषी क्षेत्रात अवतरतेय ड्रोन युग

जिल्ह्यातील 7 शेतकर्‍यांनी खरेदी केले ड्रोन

पुढारी वृत्तसेवा
डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : सध्या कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब केला जात असून, शेतकर्‍यांच्या कष्टात आणि खर्चात बचत व्हावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः एक एकरहून अधिक क्षेत्रात पीक घेतल्यास त्याच्या फवारणीसाठी मोठा वेळ आणि मेहनत लागते. यावर उपाय म्हणून शेतीसाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग सुरू झाला आहे. ड्रोनच्या मदतीने शेतात कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये आणि खतांची फवारणी समतोल प्रमाणात करता येते. यामुळे कीड आणि रोगांचा प्रभावीपणे प्रतिकार होऊन पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. याशिवाय, ड्रोनचा वापर कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामांसाठीही करता येतो.

ड्रोनमुळे वेळ आणि खर्चात बचत

ड्रोन वापरामुळे पारंपरिक पद्धतीने फवारणी करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत मोठ्या प्रमाणावर कमी होते. औषधांचा समतोल आणि नियंत्रित वापर होत असल्याने उत्पादनाचा खर्चही कमी होतो. या तंत्रज्ञानामुळे शेतकर्‍यांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधीही निर्माण होऊ शकतात.

शेतकर्‍यांना शासनाकडून अनुदान

शेतीसाठी ड्रोनचा अधिकाधिक प्रसार व्हावा आणि शेतकर्‍यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी शासनाने शेतकर्‍यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना प्रत्येकी चार लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले 1, कागल 2, राधानगरी 1, गडहिंग्लज 1, शिरोळ 1 आणि भुदरगड 1 अशा 7 शेतकर्‍यांनी हे ड्रोन खरेदी केले आहेत. यातील पाच शेतकर्‍यांना प्रत्येकी 3 लाख 90 हजार 856 आणि एका शेतकर्‍यास 4 लाख 88 हजार 517 व आणखी एका शेतकर्‍यास 3 लाख 99 हजार 560 असे एकूण 28 लाख 42 हजार 358 रुपये इतके अनुदान प्राप्त होत आहे.

तंत्रज्ञानाचा विस्तार आणि भविष्यातील उपयोग

कृषी क्षेत्रातील हा बदल शेतकर्‍यांसाठी मोठ्या फायदेशीर ठरणार असून, भविष्यात अधिकाधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करतील, अशी अपेक्षा आहे. ड्रोनचा उपयोग केवळ फवारणीपुरता मर्यादित न राहता पिकांचे निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, हवामानाचा अंदाज अशा अनेक गोष्टींसाठी केला जाऊ शकतो.

शासनाच्या पुढील योजना आणि मदतीची गरज

ड्रोनच्या खरेदीसाठी अनुदान मिळाल्याने अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित झाले आहेत. मात्र, त्याच्या देखभालीसाठी आणि कार्यक्षम वापरासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची गरज भासणार आहे. तसेच शेतकर्‍यांनी योग्य नियोजन आणि मार्गदर्शन घेतल्यास ड्रोनच्या माध्यमातून शेती अधिक आधुनिक आणि फायदेशीर बनवता येईल.

ड्रोनची किंमत 5 ते 10 लाखापर्यंत

ड्रोनच्या किमती या किती लिटर औषध वाहून नेणार त्यावर अवलंबून असतात. त्यामध्ये 10, 20 ते 50 लिटरपर्यंत औषध घेऊन पिकावर फवारणीसाठी जाणार्‍या ड्रोनच्या किमती 5 ते 10 लाखापर्यंत आहेत. सध्या जिल्ह्यातील सात शेतकर्‍यांपैकी कोणी 10 लिटर औषध क्षमतेचा तर कोणी 20 लिटर औषध क्षमतेचा ड्रोन खरेदी केला आहे.

ड्रोन वापरण्याचे फायदे

ड्रोनमधून औषध फवारणी केली असता औषधांचा समतोल राहतो. नियंत्रित वापर होत असल्याने उत्पादनाचा खर्चही कमी होतो. तसेच पंपाद्वारे कीटक नाशकांचा वापर करत असताना त्याचा फवारा नाकात गेल्याने अनेक शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला. ड्रोनद्वारे औषध फवारणी केली असता शेतकर्‍यांना बाधा होऊ शकत नाही. जीवितहानी टळू शकते.

अनुदानाचे विवरण पुढीलप्रमाणे

प्रत्येकी तीन लाख 90 हजार रुपयांचे अनुदान

सामान्य शेतकरी

4 लाख 88 हजार रुपयांचे अनुदान

कृषी पदवीधर शेतकरी

3 लाख 99 हजार रुपयांचे अनुदान

मागासवर्गीय शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT