कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी 80 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त आयोजित सहस्रचंद्रदर्शन सोहळा येत्या दि. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूरचा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार सर्वपक्षीय नागरी गौरव समितीच्या बैठकीत करण्यात आला. केवळ कोल्हापूरच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व करणार्या डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा हा सत्कार म्हणजे संपूर्ण कोल्हापूरचा सत्कार आणि सोहळा आहे अशा भावनेने जनतेचा यामध्ये सहभाग असेल, अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. कोल्हापूरच्या परंपरेला साजेशा अशा या दिमाखदार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून व सीमाभागासह गोव्यातून येणार्या पाहुण्यांचे जल्लोषात स्वागत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज होते. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने ही सर्वपक्षीय व सामाजिक संघटना आणि तालीम मंडळ प्रतिनिधींची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली होती.
डॉ. जाधव यांचा वाढदिवस कोल्हापूरकर न भूतो न भविष्यती असा साजरा करणार : खा. शाहू महाराज दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसाचा सोहळा हा ‘पुढारी’ परिवार आणि जाधव परिवार यांच्याबरोबर तमाम कोल्हापूरकरांचाच सोहळा आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरचा कार्यक्रम कोल्हापूरकर न भूतो न भविष्यती या पद्धतीने साजरा करतील आणि या सोहळ्याची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी होईल, असा विश्वास खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केला.
शाहू महाराज म्हणाले, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना त्यांचे वडील पद्मश्री ग. गो. जाधव यांच्याकडून वैचारिक वारसा मिळाला. गेल्या 6 दशकांहून अधिक काळ डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दै. ‘पुढारी’ची धुरा यशस्वीपणे पार पाडत ‘पुढारी’ची प्रगती केली आहे. दै. ‘पुढारी’चा डंका केवळ कोल्हापुरात, महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात वाजविण्याचे काम केले. 1974 मध्ये झालेला शिवराज्याभिषेक त्रिशताब्दीपूर्ती दिनाचा सोहळा असेल किंवा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मशताब्दी वर्षाचा सोहळा असेल, या सोहळ्यांचे नेटके नियोजन डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले. अतिशय तरुण वयात त्यांनी मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली. आज ऐंशीव्या वयातदेखील न थकता समाजाच्या हितासाठी ते अविरतपणे काम करत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी ठरवलंय डॉ. जाधव यांच्या वाढदिवसाचा हा सोहळा कोल्हापूरचा सोहळा आहे. तो त्या पद्धतीनेच कोल्हापूरकर मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहेत. इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल, अशा पद्धतीने हा सोहळा साजरा केला जाईल, असेही खासदार शाहू महाराज यांनी सांगितले.
डॉ. जाधव यांचा 5 नोव्हेंबरला होणारा 80 वा वाढदिवसाचा सोहळा म्हणजे कोल्हापुरात दुसरी दिवाळीच साजरी होणार असल्याचे सांगत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोल्हापूरच काय; पण महाराष्ट्रामध्ये दै. ‘पुढारी’चा दबदबा आहे. कोल्हापूरचा टोल हटविण्याचा प्रश्न असो अथवा महापूर, भूकंपासारखी स्थिती असो, कोल्हापूरकर नेहमीच इतरांच्या मदतीला धावले ते दै. ‘पुढारी’मुळेच. ‘पुढारी’ने एक हाक दिली की, कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होतो आणि तो पूरग्रस्त किंवा भूकंपग्रस्तांना दिला जातो. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला नेहमीच ताकद दिली. त्यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळाली. त्यामुळे आता डॉ. जाधव यांचा वाढदिवस कोल्हापूरकर नक्कीच मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करणार आहेत. एकप्रकारे कोल्हापुरात 5 नोव्हेंबरला दुसरी दिवाळीच साजरी होणार आहे.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले, पत्रकारितेचा मानबिंदू असलेल्या दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 80 वा वाढदिवस हा अविस्मरणीय सोहळा झाला पाहिजे. हा वाढदिवस केवळ डॉ. जाधव यांचा नाही, तर तो कोल्हापुरातील कर्तृत्ववान नेतृत्वाचा वाढदिवस आहे, ही प्रत्येक कोल्हापूरकराची भावना आहे. एका दैनिकाचे संपादक इतकेच डॉ. जाधव यांचे कार्य सीमित नसून, कोल्हापुरातील प्रत्येक विकासकाम मार्गी लावण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. आजवरचा कोल्हापूरचा सामाजिक इतिहास पाहिला, तर अनेक अडीअडचणींवर मार्ग काढण्यात डॉ. जाधव यांचा हातखंडा आहे. एखाद्या विषयावर सर्वंकष चर्चा घडवून आणणे, दोन्ही बाजूंची मार्मिक शहानिशा करणे आणि त्यातून यशस्वी निष्कर्ष काढत असताना, संपादकाच्या भूमिकेपलीकडे जात एक सुज्ञ नागरिक या नात्याने डॉ. जाधव यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व प्रक्रियेत डॉ. जाधव यांची नि:स्वार्थ भूमिका असते. सर्वक्षेत्र व्यापणार्या डॉ. जाधव यांचे कार्य अभिमान वाटावा, असे आहे. कोल्हापूरच्या मातीतील अशा व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करण्यासाठी वाढदिवसाइतके स्तुत्य निमित्त असूच शकत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील म्हणाले, डॉ. जाधव यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी गेली 50 ते 60 वर्षे अखंड योगदान दिले आहे. त्यांच्या या चौफेर कार्यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त विशेष डॉक्युमेंट्रीची निर्मिती करण्याची सूचना त्यांनी केली. सहस्रचंद्रदर्शन सोहळा सर्वपक्षीय लोकांनी एकजुटीने आणि ताकदीने साजरा करूया. विविध समित्यांच्या माध्यमातून नेटके संयोजन करूया, असेही त्यांनी सांगितले.
माजी महापौर, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) महानगर अध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे समाजातील सर्वच घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा कोल्हापूरला साजेसा असाच करावा. यासाठी सर्व घटकांना सामावून त्यांच्याकडून सूचना घ्याव्यात. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कोल्हापूरकर नागरिक यांचे वेगळे संबंध निर्माण होतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
माजी महापौर महादेवराव आडगुळे म्हणाले, कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठीच्या लढ्याची मुहूर्तमेढ डॉ. जाधव यांनी 12 मे 1974 रोजी रोवली. ‘पुढारी’च्या अग्रलेखातून त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार यांना कमीत कमी खर्चात न्याय मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 50 वर्षांहून अधिक काळ खंडपीठ चळवळीला डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळेच आज उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच झाले आहे, हे कोल्हापूरकर विसरणार नाहीत. डॉ. जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यास सहा जिल्ह्यांतील वकिलांना निमंत्रित करावे.
भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे जीवन चालता-बोलता अनुभवपट आहे. त्यांचा वाढदिवस हा लोकोत्सव होण्याच्या द़ृष्टीने त्याचे नियोजन व्हावे. कोल्हापुरातील चौका-चौकांत शुभेच्छापर डिजिटल फलक, स्वागत कमानी उभारण्यात याव्यात. तसेच, वाढदिवसाच्या अनुषंगाने डॉ. जाधव यांच्या कार्याची माहितीपत्रके घरोघरी वाटावीत. त्यांचा वाढदिवस हा कोल्हापूरचा नागरी सत्कार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, प्रत्येक क्षेत्रातील घटकाबरोबर सर्वसामान्यांशी ‘पुढारी’ची नाळ जोडलेली आहे. शहरापासून देशपातळीवर डॉ. ग. गो. जाधव यांच्यापासून डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे कार्य पोहोचले आहे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्व समाजघटक व पक्षांना एकत्र करून विविध विषयांची त्यांनी मांडणी केली आहे. अनेक माध्यम समूह गंभीर विषयात भाग घेताना संकुचित वागतात. परंतु, डॉ. जाधव यांनी ‘पुढारी’चा निर्भीड, नि:पक्ष बाणा जपला आहे. त्यांच्या वाढदिवसाची इतिहासात नोंद होईल, यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया.
सामाजिक चळवळींचे आधारवड : उत्तम कांबळे
रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, कोल्हापूरच्या सामाजिक चळवळींसह प्रत्येक क्षेत्राला भक्कम पाठबळ देऊन त्यांना आग्रेसर ठेवण्याचे काम दै. ‘पुढारी’ने सातत्याने सुरू ठेवले आहे. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे कोल्हापूरकरांसाठी आधारवड आहेत. किंबहुना, महाराष्ट्राच्या जडणघडणीत डॉ. जाधव यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाचा 80 वा वाढदिवस इतिहासात नोंद होईल अशा भव्य-दिव्य कार्यक्रमाने साजरा होणे अत्यावश्यक आहे. कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा वाढदिवस साजरा करूया. वाढदिवसाची भेट म्हणून त्यांना खंडपीठाची चांदीची प्रतिकृती भेट देऊया, अशी सूचना करत या भव्य-दिव्य सोहळ्यास कोल्हापुरातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन कांबळे यांनी केले.
डॉ. जाधव यांचा वाढदिवस कर्तृत्वाला साजेसा : संदीप देसाई
आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले, सामाजिक क्षेत्रातील अनेक चळवळींना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच बळ मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस तितक्याच तोलामोलाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा असाच झाला पाहिजे. याकरिता समिती जी जबाबदारी देईल ती पूर्ण ताकदीने पूर्ण केली जाईल, याकरिता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यरत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी 5 नोव्हेंबरला होणार्या डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितली. पाटील म्हणाले, वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र आले ही चांगली बाब आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील दिग्गज राजकीय नेते, केंद्र व राज्य सरकारमधील अनेक मंत्री येणार आहेत. त्यामुळे हा सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होईल.
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नेहमीच समाजासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. डॉ. जाधव यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी, अनुभवांनी व्यापले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी संपूर्ण आयुष्याकडे मागे वळून पाहताना जी काही शिदोरी मिळाली ती पुस्तकरूपाने संचित व्हावी, या हेतूने ‘सिंहायन’ या डॉ. जाधव यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन हा वाढदिवस कार्यक्रमाचा मानबिंदू असेल, असे पुरवणी विभागाचे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे यांनी सांगितले. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन) राजेंद्र मांडवकर, समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार, कार्यकारी संपादक विजय जाधव, निवासी संपादक राजकुमार चौगले आदी उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपनेत्या, माजी आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील, जनशक्ती महासंघाचे डी. जी. भास्कर, शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व कोल्हापूर फर्स्टचे निमंत्रक सुरेंद्र जैन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. दिलीप पोवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. चंद्रकांत यादव, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण उपस्थित होते. बैठकीला माजी आ. सुरेश साळोखे, अॅड. धनंजय पठाडे, माजी महापौर सर्वश्री मारुतराव कातवरे, नंदकुमार वळंजू, राजू शिंगाडे, सई खराडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे आनंद माने, प्रदीपभाई कापडिया, माजी नगरसेवक राजेश लाटकर, भूपाल शेटे, श्री नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, आदिल फरास, अनिल कदम, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, ईश्वर परमार, विजय सूर्यवंशी, प्रताप जाधव, रमेश पुरेकर, राजसिंह शेळके, किरण नकाते, रामचंद्र भाले, अशोकराव भंडारे, भारती पोवार, कॉमन मॅनचे अॅड. बाबा इंदुलकर, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस बाबुराव कदम, मराठा सेवा संघाचे चंद्रकांत पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, कोल्हापूर सिटीझन फोरमचे प्रसाद जाधव, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, पै. बाबा राजेमहाडिक, राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, संजय क्षीरसागर, कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक महासंघाचे सतीशचंद्र कांबळे, अरिहंत फाऊंडेशनचे जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, हॉटेलमालक संघटनेचे अरुण चोपदार, भरत रसाळे, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे किसन कल्याणकर, आरोग्यसेवक बंटी सावंत, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे फत्तेसिंह सावंत, विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड, डॉ. संदीप पाटील, मावळा संघटनेचे उमेश पोवार, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, बापू लाड, सुशील भांदिगरे, दळवीज आर्टस्चे प्राचार्य अजेय दळवी, ज्येष्ठ चित्रकार विजय टिपुगडे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, संजय करजगार, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार, संजय करजगार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, सकल मराठा समन्वयक राजीव लिंग्रस, शिवसेनेचे दुर्गेश लिंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. अनिल घाटगे, अॅड. प्रमोद दाभाडे, शाहीर अजित आयरेकर, प्रा. निवास पाटील, ओबीसी महासंघाचे चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, बाळासोा भोसले, हरी कांबळे, वीरशैव लिंगायत समाजाचे राजू वाली, राहुल नष्टे, उत्कर्ष भंडारे, तानाजी लांडगे, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संपतभाई पाटील, अजित कोठारी, अविनाश माने, रेशन धान्य दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, प्रकाश पाटील, दीपक गौड, अरुण भोसले, तुषार गुरव, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. जयश्री चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील, गीता हासूरकर, क्रीडा मार्गदर्शक डॉ. महेश कदम, जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, सुहास जाधव, दीपक भुर्के, अविनाश माने, प्रकाश पाटील, अमोल जाधव, रवींद्र तांबे, सुनील देसाई, धीरज रुकडे, अविनाश दिंडे, सुरेश कुरणे, रफीक सूरज, सुरेश राजशील, ओंकार माने, संजय चव्हाण, मनोज लगारे, सुहास जाधव, गणेश जाधव, मनसेचे अभिजित राऊत, किरण येडगे, रामचंद्र कांबळे, मंगलराव माळगे, दत्ता मिसाळ, अविनाश शिंदे, संजय लोखंडे, प्रज्योत सूर्यवंशी, विनायक कांबळे, रितेश जगताप, अविनाश शिंदे, प्रदीप मस्के, आदींसह कुणाल अतिग्रे, निखिल अतिग्रे, समीर ढोले, रणजित मिस्कीन, तुषार शिंदे, सागर शिंदे, समीर शिंदे, अमित शिंदे, साहिल शिंदे, सम—ाट शिंदे, प्रशांत शिंदे, धीरज शिंदे, सचिन शिंदे उपस्थित होते.
‘पुढारी’मुळे कोल्हापूरला चांगले वळण : खा. शाहू महाराज
दैनिक ‘पुढारी’ची स्थापना पद्मश्री ग. गो. जाधव यांनी केली. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी ‘पुढारी’चा राज्यभर विस्तार केला. वडिलांकडून मिळालेला वैचारिक वारसा त्यांनी समाजाच्या हितासाठी वापरून समाजाला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘पुढारी’ कोल्हापूरसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत असल्याचेही खा. शाहू महाराज यांनी सांगितले.
दोन पंतप्रधान कोल्हापुरात; ही ‘पुढारी’च्या निर्भीडपणाची ताकद
तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला भेट दिली ती फक्त ‘पुढारी’च्या वर्धापन दिनासाठी. पंतप्रधानपदावरील व्यक्तीला कोल्हापुरात आणण्याची ताकद ‘पुढारी’मध्ये आहे, ती निर्भीड पत्रकारितेमुळेच असल्याचे आ. क्षीरसागर आणि आ. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.
समितीच्या अध्यक्षपदी खा. शाहू महाराज
डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या 80 व्या वाढदिवस आणि सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी आयोजित बैठकीत सर्वपक्षीय नागरी गौरव समिती स्थापन करण्याचे आणि त्याचे अध्यक्षपद खासदार शाहू महाराज यांनी स्वीकारावे, असा ठराव राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मांडला. त्याला माजी महापौर आर. के. पोवार यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपद स्वीकारून खा. शाहू महाराज यांनी हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करावा, असे आवाहन केले.
डॉ. जाधव हेच कोल्हापूरच्या प्रश्नांवर रामबाण उपाय
कोल्हापूरच्या सर्वच प्रश्नांवर डॉ. प्रतापसिंह जाधव हेच रामबाण उपाय असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले. टोल, एलबीटी, ऊस दर आंदोलन याची कोंडी फोडण्याचे महत्त्वाचे योगदान डॉ. जाधव यांनी दिले आहे. एखादा प्रश्न सुटत नसेल तर काय करायचे आणि काय करायचे नाही, हे डॉ. जाधव यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक प्रश्न निकाली लागले आहेत. त्यामुळेच ते कोल्हापूरच्या सर्व प्रश्नांवरचा रामबाण उपाय आहेत.