कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरुपदी जैवतंत्रज्ञान अधिविभागप्रमुख डॉ. ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी कुलगुरु पदाच्या विशेष अधिकारातंर्गत जाधव यांची नियुक्ती केली. विद्यापीठाच्या 63 वर्षाच्या इतिहासात प्र-कुलगुरुपदी पहिल्यांदाच महिलेस संधी मिळाली आहे.
माजी कुलगुरु डी. टी. शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला. त्याचबरोबर प्र-कुलगुरु व चार अधिष्ठाता यांचा कार्यभार संपला होता. त्यामुळे प्र-कुलगुरु कोण होणार याची उत्सुकता होती. प्र-कुलगुरुपदासाठी त्यांच्या नावाच्या शिफारसीस व्यवस्थापन परिषदेने संमती दिली. कुलगुरू डॉ. गोसावी यांनी गुरुवारी सायंकाळी डॉ. जाधव यांना प्र-कुलगुरुपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले. तसेच, विद्यापीठ प्रशासनाकडून कुलपती कार्यालयास कळविले आहे. डॉ. जाधव यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. संशोधक, कंत्राटी प्राध्यापक, वरिष्ठ प्रोफेसर, अधिष्ठाता ते प्र-कुलगुरू असा चढता आलेख राहिला आहे. जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत त्यांचा समावेश आहे. विद्यापीठात नियमित कुलगुरु नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्र-कुलगुरुपदाचा कार्यकाला असणार आहे.