कोल्हापूर : गोवत्सपूजन करून वसुबारसने दिवाळीची सुरुवात झाली असून शनिवारी धनत्रयोदशीने दीपोत्सवाचे तेज उजळणार आहे. यमदीपदानाने धनत्रयोदशीचा सण घरोघरी साजरा होणार आहे. तसेच आयुर्वेदाचे जनक असलेल्या भगवान धन्वंतरी जयंतीनिमित्त विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. यंदा दिवाळी सहा दिवस साजरी होणार असून दीपोत्सवाच्या पंक्तीतील धनत्रयोदशीचा महत्त्वाचा सण साजरा करण्यासाठी कोल्हापुरात उत्साह दिसून येत आहे.
दिवाळीच्या तेजोमय पर्वातील धनत्रयोदशीचा सण हा आरोग्य आणि संपत्ती यांच्या आराधनेसाठी साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी घरोघरी धनत्रयोदशीनिमित्त दक्षिण दिशेला पिठाचा दिवा लावण्यात येणार आहे. अकाली मृत्यू येऊ नये यासाठी यमदीपदान केले जाते. तसेच दिवे दान करून धनत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे.
खरेदीला गर्दी
धनत्रयोदशीनिमित्त अख्खे धणे तसेच मिठाची खरेदी केली जाते. त्यासाठी शुक्रवारी दिवसभर बाजारात गर्दी झाली होती. विविध प्रकारचे दिवे, पणत्या खरेदीसाठी उत्साह दिसून येत होता. देवांचे वैद्य असलेल्या भगवान धन्वंतरीच्या प्रतिमा, फोटो यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. अंबाबाई मंदिरातील धन्वंतरी मंदिरात पूजेची तयारी व सजावट करण्यात आली आहे.