कोल्हापूर : शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय अनास्थेने परिसीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) घडला. एका अपघातग्रस्त व्यक्तीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर, त्याचा मृतदेह विच्छेदनासाठी नेताना तब्बल एक तास स्ट्रेचरवरच मुसळधार पावसात भिजत पडून होता. मृत्यूनंतरही झालेल्या या अवहेलनेमुळे सीपीआर प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्तहोत आहे.
मृताच्या कपड्यामध्ये गजानन वाळवेकर (वय 50, रा. गडमुडशिंगी) असे नाव लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. मात्र, त्यात संपूर्ण पत्ता मिळू शकलेला नाही. त्यामुळे लक्ष्मीपुरी पोलिसांनी पुढील तपासणीसाठी गांधीनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
बुधवारी (दि. 2) रात्री साडेबाराच्या सुमारास गडमुडशिंगी रस्त्यावरील एका हॉटेलसमोर झालेल्या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूनंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आणि पोलिसांत वर्दी देण्यासाठी एक वॉर्डबॉय आणि एक कंत्राटी महिला कर्मचारी मृतदेह स्ट्रेचरवरून अपघात विभागाशेजारील पोलिस चौकीकडे घेऊन आले. मात्र, त्याचवेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पोलिस चौकीत कोणी नसल्याने आणि नेमके काय करावे, हे न समजल्याने मृतदेह स्ट्रेचरवरच पावसात भिजत राहिला. जवळपास तासभर हा प्रकार सुरू होता; पण मृतदेह सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
अखेर इतर कर्मचार्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर आणि वर्दी देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. एकीकडे एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू आणि दुसरीकडे प्रशासनाच्या असंवेदनशीलतेमुळे मृत्यूनंतरही झालेली अवहेलना, या घटनेने सीपीआर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि मृतांच्या सन्मानाबाबतच्या गंभीर प्रश्नांना जन्म दिला आहे.