दिलीप भिसे
कोल्हापूर : पोलिस दलात कार्यरत असतानाही इब्रार इनामदारला श्रीमंतीची स्वप्ने पडली. सिद्धलक्ष्मी चहाची फर्म सुरू केली. तरीही पैसा अपुरा पडू लागला. त्याने झटपट कमाईसाठी बनावट नोटा छपाईचे टार्गेट ठेवले. खाकी वर्दीमुळे अडथळे नाहीत. हप्तेबाजी नाही. रेकॉर्डवरील गुंडासमोर लोटांगण घातले. पॉश एरिया समजल्या जाणार्या रुईकर कॉलनीतील कार्यालयात छपाईखाना सुरू केला. प्रारंभी काही नोटा सहज चलनात आल्याने टोळीने छपाईचा कारखाना रात्र-दिवस सुरू ठेवला. सहा ते सात महिन्यांत कोट्यवधीच्या नोटा बनावट छापल्या अन् तितक्याच खपविल्याही.
आधी ट्रेनिंग आणि नंतर ट्रेडिंग, असा काहीसा टोळीचा पहिल्या टप्प्यातील प्रवास ठरला. प्रिंटरवर छपाई केलेल्या बनावट नोटा खपविण्याची जबाबदारीही म्होरक्यांसह पाचजणांनी घेतली. लागणारी सामग्री, दुकानगाळ्याचा खर्च बडतर्फ पोलिस हवालदार इनामदार याने केला. मुंबईतील नोटा वितरणाची जबाबदारी सिद्धेश जगदीश म्हात्रे याने घेतली. कर्नाटक, गोव्यासाठी सुप्रीत काडाप्पा देसाई याने पुढाकार घेतला. पुण्यासाठी नरेंद्र शिंदे पुढे झाला. म्हणे, पोलिस दलातील वरिष्ठांशी त्याच्या ओळखी आहेत. कोल्हापूर, सांगलीसाठी राहुल जाधव (रा. कोरोची, ता. हातकणंगले) पुढे आला. पोलिसांची कुठे अडचण आली तर इब्रार इनामदार आहेच.
इब्रार इनामदारने चहाच्या फ्रेंचाईजीसाठी रुईकर कॉलनीसह महाद्वार रोडवर दुकानगाळे भाड्याने घेतले. रुईकर कॉलनीत दोन वर्षांपूर्वी त्याने कार्यालय थाटले. कार्यालयात त्याच्या साथीदारांची वर्दळ वाढत गेली. इनामदार पोलिस असल्याने त्याच्या कारनाम्याचा कोणालाही संशय आला नाही. जाधव, शिंदे, देसाई यांचा रात्र-दिवस तळ पडलेला. तर, इनामदार रात्री उशिरा कार्यालयात यायचा. त्यानंतर सारेजण पहाटे पाच वाजता घराकडे परतायचे.
कोल्हापूर पोलिस दलातील मोटार विभागातील चालक तथा पोलिस हवालदार इब्रार इनामदार याच्या कृत्यामुळे पोलिस दलाची मानहानी होत आहे. तत्पूर्वी, ‘मोका’अंतर्गत गुन्हेगारी टोळीवरील कारवाई रद्दसाठी सहायक फौजदाराविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात 65 लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलिस दलाची प्रतिमा डागाळली आहे. यामुळे प्रामाणिक कर्तव्य बजावणार्या घटकांना माना खाली घालाव्या लागत आहेत.
बनावट नोटांप्रकरणी राज्यात मोठ्याप्रमाणात कारवाईचे सत्र सुरू आहे. यापूर्वीही मुंबई, पुणे, भिवंडीसह कोल्हापूर, सांगली ही ठिकाणे अवैध व्यवसायासाठी केंद्रस्थानी असल्याचे उघड झाले आहे. 2020 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत राज्यात बनावट नोटांप्रकरणी 273 गुन्हे दाखल झाले आहेत. या काळात कोट्यवधीच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, 2024- 2025 या आर्थिक वर्षात 2 कोटी 17 लाख 396 नकली नोटा आढळल्या. या आकड्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत काही अंशी घट दिसत आहे. 2025 वर्षात 6 कोटी नोटांची तपासणी केली होती. त्यात 1 लाख 18 हजार बनावट नोटा सापडल्या. यामध्येही 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक आहे.