फुलेवाडी : ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या जुन्या संरक्षक दगडी भिंती अनेक ठिकाणी ढासळत आहेत. खेळणी मोडकळीस आल्यामुळे लहान मुलांना बागेत खेळणे अवघड झाले आहे. संपूर्ण रंकाळा परिसर समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. महापालिकेने अनेकवेळा तलाव विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला आहे; पण हा निधी नक्की कोणत्या कामासाठी खर्च झाला? हा रंकाळाप्रेमींना पडलेला प्रश्न आहे.
रंकाळा तलाव हे पर्यटनस्थळ असल्याने दररोज हजारो पर्यटक येथे भेट देतात. स्थानिक नागरिक व रंकाळाप्रेमी सकाळी फिरायला येतात; पण रंकाळा पदपथ उद्यानातील तलावाच्या संरक्षक भिंती अनेक ठिकाणी कोसळल्या आहेत. तलावातच दगड निखळून पडले आहेत; तर अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेले असून, भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. पडलेल्या भिंतीत पाणी जाऊन शेजारील दगडसुद्धा पडत आहेत. रंकाळा टॉवर परिसरातील संरक्षण भिंत काही दिवसांपूर्वी एका ठेकेदाराने पाडली होती. पुन्हा ती दुरुस्त न केल्यामुळे ती तशीच आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रंकाळा परिसराला भेट दिली. संरक्षक भिंती दुरुस्तीबाबत महापालिका अधिकार्यांना सूचना दिल्या; पण अजूनही त्यावर महापालिकेने काही सुधारणा केलेली नाही.
पदपथ उद्यानात असणारी खेळणी खराब झाल्यामुळे लहान मुले जखमी झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेक विद्युत दिवे बंद पडल्यामुळे रात्री बागेत अंधाराचे साम—ाज्य असते. अनेक ठिकाणी सांडपाणी थेट पाण्यात मिसळत असल्यामुळे तलावाची गटारगंगा झाली आहे. दूषित पाण्यामुळे अनेक जलचर मृत्युमुखी पडत आहेत. मासे पाण्यात कुजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसराची बाह्य सजावट करण्यासाठी एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे; पण अंतर्गत परिस्थिती खराब झाल्यामुळे रंकाळा तलाव सध्या तरी मरणयातना सहन करतो आहे. रंकाळा खरोखरच वाचवायचा असेल, तर पहिल्यांदा या भिंती दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत, अशी रंकाळाप्रेमींची मागणी आहे.