कोल्हापूर : सीपीआर येथील पोलिस चौकीतील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पोलिस कर्मचार्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने अंधरात मोबाईल टॉर्च लावून काम करावे लागत आहे, तर पंखे बंदमुळे पोलिसांचा जीव गुदमरून जात आहे. चौकीतील विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी येथील कर्मचार्यांमधून होत आहे.
सीपीआरच्या अपघात विभागाशेजारी पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. येथे 24 तास काम सुरू असते. अपघात, मारामारीसह अन्य प्रकारच्या घटनांची नोंद येथे केली जाते. किमान पन्नास ते साठ घटनांची नोंद येथे दररोज होते. अनेकवेळा रात्री अपरात्री उपचारासाठी आणलेल्या रुग्णांचे नातेवाईक वर्दी देण्यासाठी येतात. पण वीज पुरवठा खंडित झाला की, पोलिस चौकी शोधावी लागते, अशी येथे परिस्थिती असते. विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत नातेवाईकांना प्रतिीतक्षेत थांबावे लागते. पोलिस चौकीचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर येथे प्रकाशाची सोय नाही. त्यामुळे कर्मचारी हतबल झाले आहे. घामाघूम होत मोबाईलची टॉर्च लावून वर्दी नोंद करावी लागत आहे.