कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या लाकडी खांब उभारणीच्या कामाचा प्रारंभ सोमवारी द्वार प्रतिष्ठापना व पूर्णाहुती होम विधीने करण्यात आला. सर्व 52 खांब तयार झाले असून मंगळवार (दि. 15) पासून प्रत्यक्ष खांब उभारणीला सुरुवात होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माध्यमातून अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधींसाठी महत्त्वाचा असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्उभारणीसाठी स्वनिधीतून 12 कोटी 85 लाख 92 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लाकडी खांब खचल्याने व त्यांना वाळवी लागल्याने मूळ गरुड मंडप धोक्यात आला होता. पुनर्उभारणीसाठी कर्नाटकातील दांडेलीसह अन्य गावांतून सागवानी लाकूड आणण्यात आलेे. टेंबलाई मंदिर परिसरात 22 कारागीरांमार्फत या लाकडापासून 52 खांब तयार करण्यात आले. खांब उभारणीनंतर कमान बसवणे, तुळई लावणे आणि छत उभारण्याचे काम द़ृष्टिक्षेपात आहे.
नव्या बांधकामात दगडी मुरुमाचा वापर करून गरुड मंडपाचा पाया मजबूत करण्यात आला आहे. तसेच हे खांब खचू नयेत तसेच हवामान, आर्द्रता यापासून संरक्षण व्हावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत ऑईल ट्रिटमेंट करण्यात आली आहे. नव्याने बनवलेले लाकडी खांब मुरुम व दगडी चुर्याच्या पायामध्ये रोवले जाणार असल्याने अधिक भक्कम होणार आहेत.
अंबाबाई मंदिराच्या उभारणीनंतरच्या काळात 1844 ते 1867 या कालावधीत गरुड मंडप बांधण्यात आला. अंबाबाई मंदिरात भाविकांकडून होणारा अभिषेक विधी, गणेशोत्सव, अंबाबाईचे विविध सोहळे तसेच पालखी मिरवणुकीतील उत्सवमूर्ती विराजमान होण्यासाठी गरुड मंडपाचे महत्त्व आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी गरुड मंडपाच्या जागेवर पारंपरिक विधी व धार्मिक पद्धतीने मंत्रोच्चारात होम करण्यात आला. यावेळी मंडपाच्या द्वार प्रतिष्ठापनेने पुरोहित विकास जोशी, पंकज दादर्णे, प्रमोद उपाध्ये यांनी पूजा विधींना सुरुवात झाली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रशासक जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. कार्तिकेयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर, महादेव दिंडे, शरद मुनीश्वर उपस्थित होते.