कोल्हापूर : राज्य शासनाने बुधवारपर्यंत हद्दवाढीचा आदेश काढावा किंवा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्रानुसार महापालिकेने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अन्यथा गुरुवारी (दि. 3) महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा खणखणीत इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने दिला आहे. आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी दिला.
कृती समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. 1972 पासून या मागणीसाठी संघर्ष सुरू असूनही राजकीय इच्छाशक्ती-अभावी हा प्रश्न सुटला नाही, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
समितीचे समन्वयक आणि माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, राज्य सरकारने हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून नुकतीच मुंबईत बैठकही झाली. मात्र, अद्याप महापालिकेला कोणताही अधिकृत आदेश प्राप्त झालेला नाही. आमदार क्षीरसागर यांनी प्रस्ताव पाठवण्यासाठी प्रशासनाला पत्र दिले आहे, त्यावर तातडीने कार्यवाही अपेक्षित आहे. निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे आदेश आले असून त्याआधी हद्दवाढीचा निर्णय होणे अत्यावश्यक आहे.
हद्दवाढीसाठी झालेल्या मुंबईतील बैठकीवरून सत्ताधारी आमदारांमध्येच मतभेद असल्याचे चित्र समोर आले आहे. पालकमंत्री सकारात्मक भूमिका मांडत असताना त्यांच्याच पक्षाचे एक आमदार ही बैठक अशासकीय आणि बेकायदेशीर असल्याचे सांगत आहेत. यामुळे सरकार कोल्हापूरकरांच्या तोंडाला पाने पुसत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी उपस्थित केला. या गोंधळामुळे कृती समितीमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार क्षीरसागर यांच्या पत्रावर महापालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासन केवळ शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहे. ही भूमिका म्हणजे आमदार आणि कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे, असे मत बाबा इंदुलकर यांनी मांडले. हद्दवाढ विरोधक जसे गावे बंद ठेवतात, त्याप्रमाणे कोल्हापुरात येणारे मार्ग बंद करून ‘चक्काजाम’ आंदोलन करावे, अशी सूचना ‘आप’चे संदीप देसाई यांनी मांडली. यापुढे आक्रमक झाल्याशिवाय पर्याय नाही, असे मनसेचे राजू जाधव म्हणाले.
या बैठकीला दिलीप देसाई, सुनील देसाई, सुशील भांदिगरे, महादेव पाटील, सुरेश कुरणे, अभिजित कांबळे, फिरोज सरगुर यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईतील बैठकीबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भूमिका सकारात्मक असताना, त्यांच्याच पक्षाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी ती बैठक अशासकीय ठरवली आहे. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा, अशी मागणी आर. के. पोवार यांनी केली.