कोल्हापूर ः दिवाळी आली की, प्रत्येक घरात सणासुदीचा गजर सुरू होतो; पण घराच्या एका कोपऱ्यात मात्र काही लहान हात आपल्या कल्पकतेने इतिहासाची मोहीम छेडत असतात. दगड, माती, झुडपे, कागद आणि खड्ड्यांमधून ते साकारत असतात सिंहगड, राजगड, प्रतापगड! चिमुकल्यांकरिता दिवाळी म्हणजे केवळ फटाके नाही, तर शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या किल्ल्यांच्या उभारणीची पर्वणी असते. त्यांच्या हातून उभारणारे हे गडकोट म्हणजे खेळ नसून त्यांचे इतिहासाशी गहिरे नाते सांगणारी सर्जनशील अभिव्यक्ती आहे.
किल्ल्यांची उभारणी ही केवळ एक कला नसून आपल्या मातृभूमीशी जोडणारा एक बंध आहे. इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज लहानपणीच मातीचे किल्ले बनवत. हीच प्रेरणा आजची पिढी नव्या रूपात घेते आहे. जिल्ह्यासह शहराच्या कानाकोपऱ्यात आणि गल्लीबोळात चिमुकल्या हाताकडून सिंहगड, राजगड, रायगडासारखे किल्ले लघुरूपात साकारले जात आहेत. अर्थात, शालेय परीक्षा लवकरच संपतील आणि दिवाळीची सुट्टी सुरू झाली की, या कामांना आणखी वेग येईल. या निमित्ताने मुलांना इतिहासातील गोडी, संशोधनाची आवड निर्माण होते, शिवाय त्यांच्यात शौर्य, नेतृत्व व राष्ट्रप्रेमाचे बीजही रोवले जाते.
किल्ले बांधणी म्हणजे सांस्कृतिक वारशाशी नाळ जोडण्याचा सेतू असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी किल्ला स्पर्धाही घेतल्या जात आहेत. या किल्ल्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. या स्पर्धांमध्ये मुलांबरोबरच पालक आणि तरुणाईही सक्रिय सहभाग घेत आहे. गड-किल्ले साकारण्यास लगणारी माती, दगड, विटा गोळा करण्यात मुले व्यस्त असून काही मुले बाजारातील गड-किल्ल्यांच्या तयार प्रतिकृती खरेदी करताहेत.